रेल्वे पदभरती बोर्डाचे संकेतस्थळ ठप्प; हॉल तिकीट निघत नसल्याने लाखो उमेदवार संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:40 PM2018-09-19T15:40:02+5:302018-09-19T15:40:32+5:30
अकोला: रेल्वेतील विविध पदांच्या आॅनलाइन नोकर भरतीची परीक्षा ऐन तोंडावर आलेली असताना रेल्वे बोर्डाचे संकेतस्थळ ठप्प पडल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे.
- संजय खांडेकर
अकोला: रेल्वेतील विविध पदांच्या आॅनलाइन नोकर भरतीची परीक्षा ऐन तोंडावर आलेली असताना रेल्वे बोर्डाचे संकेतस्थळ ठप्प पडल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे. हॉल तिकीट मिळत नसल्याने परीक्षेची तारीख आणि केंद्र ठिकाणाचा पत्ताच उमेदवारांना कळेनासा झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
रेल्वेतील विविध पदांच्या नोकर भरतीसाठी रेल्वे बोर्डाने (आरआरबी) अर्ज मागविले होते. आॅनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण झाली. लाखो उमेदवारांचे हॉल तिकीटही पोर्टलवर बोर्डाने अपलोड केले. १७ सप्टेंबर ते २० सप्टेंबर १८ दरम्यान देशभरातील कें द्रांवर ही परीक्षा घेतली जात आहे; मात्र रेल्वे पदभरती बोर्डाच्या संकेतस्थळावर एकच गर्दी झाल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त युजर वाढल्याने साइट हँग झाली आहे. परीक्षेच्या तोंडावर ही डिजिटल समस्या उद्भवल्याने लाखो उमेदवार संभ्रमात पडली आहेत. हॉल तिकीट मिळविण्यासाठी उमेदवार सायबर कॅफेचे उंबरठे झिजवून थकले आहेत. डिजिटल इंडियाच्या अकार्यक्षम तंत्रज्ञानाचा फटका लाखो उमेदवारांना बसणार असल्याने ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
मोबाइल, ई-मेल, ओळखपत्रांचा आधार
मुंबई चर्चगेटच्या संकेतस्थळाशी संपर्क साधला असता, साइट ठप्प असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. त्यातून मार्ग काढण्यासाठी उमेदवारांच्या मोबाइल आणि ई-मेलवर मॅसेजद्वारे परीक्षेची तारीख आणि केंद्राचे ठिकाण कळविण्यात आले आहे. मॅसेजची हार्डकॉपी सोबत पॅन किंवा आधारचे ओळखपत्र घेऊन जाणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे सांगण्यात आले.