आता अकोला स्थानकावरच मिळणार रेल्वेचे दिव्यांग प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:30 PM2019-12-25T13:30:29+5:302019-12-25T13:30:38+5:30
दक्षिण-मध्य रेल्वेने आता अकोला व वाशिमसह नऊ रेल्वेस्थानकांवर दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
अकोला : रेल्वेत प्रवास करताना दिव्यांग व्यक्तींना प्रवास भाड्याच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आता दक्षिण-मध्य रेल्वेच्यानांदेड येथील विभागीय कार्यालयात हेलपाटे घेण्याची गरज राहणार नाही. दक्षिण-मध्य रेल्वेने आता अकोला व वाशिमसह नऊ रेल्वेस्थानकांवर दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
भारतीय रेल्वेकडून प्रवासी भाड्यात विविध प्रकारची सुट दिल्या जाते. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना प्रवासी भाड्यात सुट मिळते. याकरिता संबंधित व्यक्तीला रेल्वेचे तिकीट काढताना दिव्यांग प्रमाणपत्र सादर करावे लागते. भारतीय रेल्वे दिव्यांग व्यक्तींना आरक्षित प्रवासी तिकीट काढण्यासाठी एक आॅनलाइन विशिष्ट कार्ड देत आहे. हे विशिष्ट आयडी कार्ड प्राप्त करण्यासाठी ठराविक कागदपत्रांसोबत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. हा अर्ज नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात सादर करावा लागत असे. यासाठी नांदेड विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड येथील विभागीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत. दिव्यांग व्यक्तींना होणारा त्रास लक्षात घेतना नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयाच्या वाणिज्य शाखेने दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जवळच्या रेल्वेस्थानकावरच युनिक आयडी कार्डसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या निर्णयामुळे आता यापुढे दिव्यांग व्यक्तींना नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. दिव्यांग व्यक्ती आता त्यांच्या जवळच्या रेल्वेस्थानकावरील तिकीट बुकिंग कार्यालयात दिव्यांग सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करू शकतात, असे दक्षिण-मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने कळविले आहे.
या स्थानकांवर करता येईल अर्ज
अकोला, वाशिम, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, आदिलाबाद येथील रेल्वेस्थानकांवर युनिक आयडी कार्ड मिळविण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.