उड्डाणपुलाचे रेल्वे हद्दीतील कामही 'पीडब्ल्यूडी' करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:31 PM2019-05-25T13:31:59+5:302019-05-25T13:32:05+5:30
अकोला: स्थानिक न्यू तापडिया नगराच्या उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील बांधकामदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे.
अकोला: स्थानिक न्यू तापडिया नगराच्या उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील बांधकामदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्यामुळे या रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम येत्या दोन वर्षाच्या आत पूर्ण होण्याचे संकेत आहे.
सातव चौकापासून न्यू तापडिया नगरापर्यंतच्या रेल्वे ओव्हर ब्रीज उभारणीचे काम सुरू झाले आहे. न्यू तापडिया नगरच्या बाजूने कंत्राट कंपनीने प्लॅन्ट टाकला आहे. न्यू तापडिया नगर आणि सातव चौकाकडून हे काम सुरू होत असले तरी अद्याप रेल्वे विभागाने त्यांच्या हद्दीतील कामास परवानगी दिलेली नाही. रेल्वेच्या परवानगी आणि त्यांच्या स्वतंत्र कामकाजाच्या यंत्रणेमुळे अकोल्यातील आधीच डाबकी आरओबीचे बांधकाम रखडलेले आहे. ही स्थिती न्यू तापडिया नगरच्या आरओबीची होऊ नये यासाठी अकोलासार्वजनिक बांधकाम विभागाने आधीच पत्रव्यवहार सुरू केला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने न्यू तापडिया नगरच्या रेल्वे हद्दीतील बांधकामही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविले आहे; मात्र या संपूर्ण कामाची देखरेख ही रेल्वे अधिकारी आणि त्यांच्या तज्ज्ञ अभियंत्याकडे राहणार आहे. वास्तविक पाहता, रेल्वे हद्दीतील प्रत्येक बांधकाम रेल्वे प्रशासनाद्वारे केले जाते; मात्र हे पहिले काम आहे की, रेल्वे प्रशासनाने ही जबाबदारी सा.बां.कडे सोपविली आहे. हाती घेतलेले प्रकल्प तातडीने मार्गी लागावे म्हणून हे काम रेल्वे प्रशासनाने राज्याकडे सोपविले आहे. जवळपास १५५ मीटरच्या व्यासाचा हा उड्डाण पूल मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे लाइनच्या वरून जाणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांच्या आत न्यू तापडिया नगराच्या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. डाबकी आरओबीचे बांधकाम तब्बल दोन वर्षांपासून रखडल्यामुळे त्रस्त झालेल्या अकोलेकरांची स्थिती पाहता, न्यू तापडिया नगराच्या आरओबीचे काम लवकर पूर्ण होण्याचे संकेत आहे. अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता हेमंत राठोड, उपअभियंता महेश देशमुख आणि सहायक गणवीर कामकाज पाहत आहेत.