रेल्वेचे दिवाळीतील आरक्षण फुल; मुंबईसाठी ११३ वेटिंग
By Atul.jaiswal | Published: September 29, 2021 12:06 PM2021-09-29T12:06:28+5:302021-09-29T12:09:27+5:30
Railways Diwali reservation full : अमरावती - मुंबई या लोकप्रिय गाडीत सात नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी ११३ वेटिंग आहे.
अकोला : सणासुदीच्या काळात रेल्वेचे आरक्षण फुल असते, हा नेहमीचाच अनुभव असून, यंदा कोरोनाच्या सावटातही हाच ट्रेंड कायम आहे. हिंदूंचा सर्वात मोठा सण दिवाळी हा अजून दोन महिन्यांनंतर असला, तरी दिवाळीतील रेल्वेचे आरक्षण आताच फुल झाले आहे. मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये दिवाळीनंतरच्या दिवसांत वेटिंग लिस्ट मोठी असल्याचे आरक्षण चार्टवरून दिसून येत आहे. अमरावती - मुंबई या लोकप्रिय गाडीत सात नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी ११३ वेटिंग आहे.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये नोकरदार वर्ग तसेच व्यावसायिकही बाहेरगावी जाण्याचे बेत आखतात. ऐनवेळी धांदल उडू नये म्हणून अनेकजण आतापासूनच रेल्वे तिकीट आरक्षण करून ठेवतात. येत्या ४ नोव्हेंबर रोजी दिवाळी असून, दिवाळीनंतरचे रेल्वेचे आरक्षण आताच फुल झाले आहे. मुंबई ते कोलकाता या मार्गावरील महत्त्वाच्या असलेल्या अकोला स्थानकावरून दररोज तब्बल ११२ एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा सुरू आहे. मुंबई, पुणे महानगरांकडे जाणाऱ्या जवळपास सर्वच गाड्यांमध्ये शयनयान व वातानुकूलित श्रेणीच्या तिकिटांसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे. नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मात्र आरक्षण उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.
कोणत्या गाड्यांना किती वेटिंग?
०२११२ अमरावती - मुंबई - ११३ वेटिंग
०१०५२ हावडा - एलटीटी - ४५ वेटिंग
०२१०६ गोंदिया - मुंबई - २९ वेटिंग
०२२८० हावडा - पुणे - ९३ वेटिंग
०१०४० गोंदिया - कोल्हापूर - ६१ वेटिंग
सध्या सुरू असलेल्या एक्स्प्रेस
०२११२ अमरावती एक्स्प्रेस
०२१०६ विदर्भ एक्स्प्रेस
०१०४० महाराष्ट्र एक्स्प्रेस
०२२८० आझाद हिंद सुपरफास्ट
०२१०१ ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्स्प्रेस
जादा भाडे मोजावे लागणार
कोरोनाची लाट ओसरली असली, तरी रेल्वेने अजूनही विशेष गाड्या सुरूच ठेवल्या आहेत. या विशेष व डायनॅमिक फेअर असलेल्या काही स्पेशल गाड्यांमध्ये साधारण गाड्यांपेक्षा अधिक भाडे मोजावे लागते. दिवाळीत कुटुंबासह बाहेर जाणाऱ्यांना जादा भाडे मोजूनच प्रवासाला जावे लागणार आहे.