रेल्वेला ४३ लाखांचा फटका; प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 10:21 AM2021-07-17T10:21:41+5:302021-07-17T10:21:58+5:30

Akola Railway station : २०१९-२० मध्ये अकोला स्थानकावरून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या माध्यमातून ४५ लाख रुपयांची कमाई केली होती; परंतु गतवर्षी १ लाख ८५ हजार रुपयांचीच तिकिटे विकली.

Railways hit by Rs 43 lakh; Earnings from platform tickets dropped! | रेल्वेला ४३ लाखांचा फटका; प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई घटली!

रेल्वेला ४३ लाखांचा फटका; प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई घटली!

Next

- सागर कुटे

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बहुतांश रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्म तिकीटही ५० रुपये करण्यात आले होते. प्रवासीही प्रवास टाळत होते; मात्र यामुळे रेल्वेच्या तिकीट विक्रीवर मोठा परिणाम झाला. रेल्वेने २०१९-२० मध्ये अकोला स्थानकावरून प्लॅटफॉर्म तिकिटांच्या माध्यमातून ४५ लाख रुपयांची कमाई केली होती; परंतु गतवर्षी १ लाख ८५ हजार रुपयांचीच तिकिटे विकली. त्यामुळे रेल्वेला ४३ लाख १५ हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या. दुसऱ्या लाटेत जवळपास तीन महिने रेल्वे सेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्स्प्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. मध्यंतरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दी होऊ नये, याकरिता प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता कोरोना रुग्णसंख्या घटत असून, निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे हे तिकीट पुन्हा दहा रुपये झाले आहे; परंतु या काळात प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री घटली. त्यामुळे रेल्वेला ४३ लाख रुपयांचा फटका बसला आहे; मात्र आता तिकीट १० रुपये झाल्याने प्रवाशांच्या आप्तांना दिलासा मिळाला आहे.

प्लॅटफॉर्म तिकिटातून कमाई

२०१९-२०

४५ लाख

२०२०-२१

१,८५,०००

या गाड्या कधी सुरू होणार?

अमरावती-सुरत एक्स्प्रेस

भुसावळ-वर्धा पॅसेंजर

भुसावळ-नागपूर पॅसेंजर

भुसावळ-नगखेड पॅसेंजर

प्रवासी वाढले!

कोरोनाकाळात कडक निर्बंध असल्याने सर्व काही बंद होते. या वेळी रेल्वे चालू असल्या तरी प्रवासी मात्र कमी होते. बहुतांश व्यक्ती रेल्वेने प्रवास टाळत होते; परंतु राज्यात झालेल्या अनलॉकनंतर आता रेल्वे प्रवाशांची संख्या सर्व ठिकाणी वाढली आहे. त्यानुसार अकोला रेल्वे स्थानकावरही गर्दी वाढत आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लागली आहे.

 

पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा

कोरोना संसर्गाच्या नावाखाली अजूनही विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत; मात्र पॅसेंजर गाड्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. विशेष गाड्यांमध्ये केवळ आरक्षण केलेल्यांनाच प्रवास करता येतो. त्यामुळे आरक्षण न मिळालेल्यांची गोची होत आहे. शिवाय आरक्षण तिकीट महाग असल्याने सर्वसामान्यांच्या खिशालाही कात्री लागत आहे.

Web Title: Railways hit by Rs 43 lakh; Earnings from platform tickets dropped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.