रेल्वे सुरू, पण ज्येष्ठांची सवलत बंद कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 10:59 AM2022-02-22T10:59:52+5:302022-02-22T11:04:15+5:30

Akola Railway Station : ३० टक्क्यांची सवलत अजूनही बंद असल्याने अनेकांच्या खिशाला झळ बसत आहे.

Railways start, but why stop senior citizens' concessions? | रेल्वे सुरू, पण ज्येष्ठांची सवलत बंद कशासाठी?

रेल्वे सुरू, पण ज्येष्ठांची सवलत बंद कशासाठी?

Next
ठळक मुद्देवृद्धांच्या खिशाला झळ ३० टक्क्यांची सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी

अकोला : कोरोना संसर्गाची तिसरी लाटही ओसरत आली असून, रेल्वेची प्रवासी वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत झाली आहे. कोरोना काळात धावणाऱ्या गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या नियमित झाल्या असल्या तरी कोरोनाकाळापूर्वी रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर मिळणारी ३० टक्क्यांची सवलत अजूनही बंद असल्याने अनेकांच्या खिशाला झळ बसत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वे सेवा बहाल करण्यात आल्या. गतवर्षी डिसेंबरमध्ये रेल्वे गाड्यांचा विशेष दर्जाही काढण्यात येऊन त्या नियमित गाड्या म्हणून धावू लागल्या आहेत. तथापी, आरक्षित तिकिटांवर प्रवास करण्याची अट मात्र अजूनही लागूच आहे. खिडक्यांवरील तिकीट विक्री अद्यापही सुुरू झालेली नाही. याशिवाय कोरोनाकाळापूर्वी रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलतही अद्याप पूर्ववत झालेली नाही. सर्व गाड्या नियमित झाल्यानंतरही सवलत बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना नाहक महागडे तिकीट काढावे लागत आहे. रेल्वेतील सवलती पुन्हा सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.

 

किती मिळते सवलत?

रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मूळ भाड्याच्या तीस टक्के सवलत देण्यात येते. ही सवलत सर्वच प्रकारच्या श्रेणींमध्ये लागू आहे. एखाद्या गाडीत प्रवास करण्यासाठी प्रवाशाला १०० रुपये तिकीट असेल तर ज्येष्ठ नागरिकांना केवळ ७० रुपये तिकीट मोजावे लागते.

 

विशेष रेल्वेचा दर्जा काढला, तरी सवलत बंदच

कोरोना काळात ठप्प असलेल्या रेल्वेगाड्या पुन्हा सुरु केल्यानंतर त्या गाड्या काही महिने विशेष दर्जा म्हणून चालविण्यात आल्या. या गाड्यांच्या क्रमांकापूर्वी शून्य लावण्यात आला होता. आता क्रमांकापूर्वीचा शून्य काढून या गाड्या नियमित म्हणून सुरु करण्यात आल्या आहेत. तथापि, रेल्वेत पूर्वी मिळणाऱ्या बहुतांश सवलती बंद आहेत.

 

ज्येष्ठांना फटका

 

पूर्वी रेल्वेत तिकिटावर ३० टक्के सवलत मिळत असे. त्यामुळे प्रवास करणे खिशाला जड जात नव्हते. गत दोन वर्षांपासून ही सवलत बंद आहे. त्यामुळे महागडे तिकीट काढावे लागत आहे.

 

- रामेश्वर काळदाते, ज्येष्ठ प्रवासी

 

कामानिमित्त अनेकदा रेल्वेचा प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रवास भाड्यात सवलत मिळायची, तेव्हा प्रवास करणे परवडत होते. आता महाग तिकीट काढावे लागत आहे. ज्येष्ठांसाठीची सवलत पुन्हा सुरु करण्यात यावी.

 

- दिनकर गावत्रे, ज्येष्ठ प्रवासी

 

रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतींसह इतर सवलती लवकरच सुरु करण्यात याव्यात, यासाठी अनेकदा मागणी केली आहे. यासंदर्भात सकारात्मक विचार सुरु असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

 

- अमोल इंगळे, विदर्भ यात्री संघ, अकोला

Web Title: Railways start, but why stop senior citizens' concessions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.