पश्चिम विदर्भात पुन्हा अवकाळी पाऊस
By admin | Published: March 11, 2015 01:37 AM2015-03-11T01:37:45+5:302015-03-11T01:37:45+5:30
अकोला जिल्ह्यात गारपीट, पिकांचे नुकसान.
अकोला : पश्चिम विदर्भास सलग दुसर्या दिवसी वादळी वार्यासह अवकाळी पावसाचा फटका बसला. अकोला आणि बुलडाण्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर कमी होता. बुलडाणा जिल्ह्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर आणि बाश्रीटाकळी तालुक्यात सोमवारी गारपीट झाली. मंगळवारी सायंकाळी पातूर तालुक्यातील चान्नी येथे वादळी वार्यासह गारपीट झाली. अकोला शहरातही रात्री ७ वाजताच्या सुमारास वादळी वार्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. चान्नी येथे सायंकाळी ६.३0 वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत वादळी पावसासह हरभर्याच्या आकाराची गारपीट झाली. वादळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. चान्नी येथे वादळीवार्यामुळे अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली. या भागात सुमारे अर्धातास गारपीट सुरू होती. वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेतातील गहू, हरभरा, तूर, कपाशी आदी पिकांसह कांदे, आंबे व अन्य फळपिकांचे, तसेच पालेभाज्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील दिग्रस, वाडेगाव, खेट्री, चतारी, पिंपळखुटा, चांगेफळ, शिरपूर, राहेर आदी गावांमध्येही वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा विस्कळीत झाला. अकोला शहर आणि परिसरात सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ६.३0 वाजतानंतर वादळी वारा सुटला. त्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. रात्री ९ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. दरम्यान, वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव आणि परिसरात जोरदार पाऊस पडला.