पावसाचे विघ्न; हजारो मूर्ती विक्रीविना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:40+5:302021-09-10T04:25:40+5:30
अकोला : गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. शुक्रवारपासून गणरायाची स्थापना करण्यात येणार असून, भक्तांची मूर्ती खरेदीची लगबग सुरू आहे; परंतु ...
अकोला : गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. शुक्रवारपासून गणरायाची स्थापना करण्यात येणार असून, भक्तांची मूर्ती खरेदीची लगबग सुरू आहे; परंतु यंदा मूर्तींची किंमत वाढली आहे. तसेच मोदक, साजही महागला आहे. त्यात गत दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे ग्राहक फिरकतही नसल्याचे मूर्ती विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हजारो मूर्ती विक्रीविना असल्याने बाजारात चिंतेचे वातावरण आहे. गणरायांचे आगमन अवघ्या एक दिवसावर आल्याने साऱ्याच गणेशभक्तांची बाप्पांच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे. गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुरुवारी बाजारात गणपती खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.
दुकानाची उभारणी, चिखल हटविण्यातच गेले तीन दिवस
शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. परंतु परवानगी मिळाल्यानंतर दोन-तीन दिवस दुकानाची उभारणी व चिखल हटविण्यातच गेल्याने व्यवसाय होऊ शकला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
उरला केवळ एक दिवस
गुरुवारी पावसाने उघाडा दिल्याने गणेश मूर्ती खरेदीसाठी गर्दी वाढली होती. यामुळे मूर्ती विक्रेत्यांनाही काहीसा दिलासा मिळाला. परंतु आता केवळ एक दिवस बाकी असून, तेही दुपारी २ पर्यंतच मूर्ती होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
६० टक्के ग्राहक मास्कविना
शहरातील दुकानांवर मूर्ती खरेदीसाठी आलेल्या ६० टक्के ग्राहकांनी मास्क घातलेच नसल्याचे निदर्शनास आले आहे. क्रिकेट क्लब मैदानावरही हीच परिस्थिती होती. तसेच मूर्ती विक्रेत्यांनीही मास्क घातले नसल्याचे दिसून आले.
मूर्ती विक्रेते म्हणतात...
यावर्षी पीओपीचे दर वाढले आहे. त्यामुळे गणेश मूर्तींच्या किमतीही वाढल्या आहेत. ग्राहकांकडून कमी प्रतिसाद मिळत असून, मूर्ती शिल्लक राहण्याची भीती आहे.
- ज्ञानेश्वर मेकरे
मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. गतवर्षी ३००-३५० रुपयांना विक्री होणारी मूर्ती ५००-५५० रुपयांना विकावी लागत आहे. यंदा रंग, साज सह इतर साहित्याचे दरही वाढले आहे.
- गौरव मिश्रा
मागीलवर्षीपेक्षा यंदा प्रतिसाद कमी आहे. वारंवार पावसाचा व्यत्यय येत असल्याने व्यवसाय करण्यात अडचणी येत आहे. ग्राहक फिरकतही नाहीत.
- सचिन प्रजापत
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी मंदीचे वातावरण आहे. सजावटीच्या साहित्याची मागणी घटली आहे. त्यात शासनाच्या निर्बंधांमुळे अडचणी वाढल्या आहे.
- बाबू बागडे, डेकोरेशन व्यावसायिक
दीड वर्षापासून मंदीत असलेला फूल व्यवसाय पुन्हा फुलू लागला आहे. गत महिन्यापासून ग्राहक वाढले आहे. सोबत भावही वाढले आहेत.
- अन्सार भाई, फुलविक्रेता
या गणेशोत्सवात घरगुती सजावटीच्या साहित्याचे दर कायम आहेत. यंदा विविध नवीन प्रकार उपलब्ध झाल्याने ग्राहकांचा प्रतिसादही चांगला आहे.
- संजीव सिंघानी, सजावट साहित्य विक्रेता
कोरोना काळात किराणा साहित्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे लाडू, मोदक व पेढ्याच्या किमती वाढल्या आहेत. ग्राहकही येत आहेत.
- हिमेश खिलोसीया, मिठाई विक्रेता