पावसामुळे पोलिस भरतीत व्यत्यय; वेळापत्रकात बदल; एक हजार उमेदवारांची ९ जुलैला घेणार चाचणी
By आशीष गावंडे | Published: June 22, 2024 07:45 PM2024-06-22T19:45:54+5:302024-06-22T19:46:18+5:30
२२ जून रोजी एक हजार उमेदवारांची घेतली जाणारी चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून संबंधित उमेदवारांना ९ जुलैची तारीख देण्यात आली आहे.
अकाेला: जिल्हा पाेलिस दलाच्यावतीने पाेलिस शिपाई पदाच्या १९५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. दरम्यान, २१ जूनच्या मध्यरात्री पाऊस आल्यामुळे पोलिस भरतीमध्ये व्यत्यय आला आहे. २२ जून रोजी एक हजार उमेदवारांची घेतली जाणारी चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून संबंधित उमेदवारांना ९ जुलैची तारीख देण्यात आली आहे.
पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर पाेलिस शिपाई पदाच्या
भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात पुरुष वर्ग व दुसऱ्या टप्प्यात महिला वर्गातील उमेदवारांना बाेलावण्यात आले आहे. चाचणी दरम्यान पुरुष उमेदवारांच्या छाती व उंचीचे मोजमाप घेतली जात आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पात्र उमेदवारांची सर्वप्रथम १०० मीटर धावण्याची चाचणी व गोळाफेक चाचणी घेऊन त्यानंतर १६०० मीटर धावण्याची चाचणी ही वसंत देसाई स्टेडीयममध्ये घेण्यात येत आहे.
उमेदवारांचा मुक्काम, वाहतुकीची केली व्यवस्था जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार पोलिस भरतीसाठी एक दिवस आधी बाहेरगावावरून आलेल्या उमेदवारांच्या मुक्कामाची व्यवस्था पाेलिस लाॅनमधील राणी महलमध्ये निःशुल्क स्वरूपात करण्यात आली आहे. मैदानावर चाचणी दरम्यान पाणी, शौचालय, रूग्णवाहिका आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच उमेदवारांना पोलिस मुख्यालयापासून वसंत देसाई स्टेडियम पर्यंत नेण्यासाठी वाहन व्यवस्था केली आहे.
१६ हजार १६१ पुरुष उमेदवारांचे अर्ज
पदभरतीसाठी एकूण २१ हजार ८५३ उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत .यामध्ये १६ हजार १६१ पुरुष उमेदवार आहेत. २२ जून राेजी १हजार उमेदवारांची चाचणी घेतली जाणार होती;परंतु, पावसामुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. २४ जून ते १ जुलै या कालावधीत १हजार ५०० उमेदवार, २ जुलै राेजी सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील १ हजार ६२ पुरुष उमेदवार व त्यानंतर ३ जुलै राेजी भुकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, तृतीयपंथी, होमगार्ड, पोलिस पाल्य, खेळाडू, प्रकल्पग्रस्त आदी प्रवर्गातील सर्व पुरुष उमेदवारांची चाचणी पार पडेल.