पाऊस पडेना..अधिकारी मिळेना
By admin | Published: July 3, 2014 10:46 PM2014-07-03T22:46:05+5:302014-07-04T00:44:21+5:30
कृषी कार्यालयात कर्मचार्यांचा दुष्काळ
आकोट: कृषी उत्पादन वाढीसाठी शेतकर्यांना मार्गदर्शनाची निकड लक्षात घेऊन उघडलेल्या आकोट तालुका कृषी कार्यालयात अधिकारी-कर्मचार्यांचा दुष्काळ पडला आहे. अधिकारी-कर्मचार्यांची ६७ पदे मंजूर असलेल्या तालुका कृषी कार्यालयात केवळ २८ कर्मचारीवर्ग उरला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी सोडाच; पण तालुका कृषी अधिकारीसुद्धा कार्यरत नाहीतच. पण कार्यरत असलेले कर्मचारीसुद्धा प्रभार सांभाळण्यात वेळ मारून नेत आहेत.
शेती क्षेत्राशी निगडित सर्व विभागांचा त्यात समावेश करून ग्रामीण भागात शेतीमधे उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरून आवश्यक ती मदत करण्याच्या उद्देशाने जुलै १८८३ मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. प्रशासकीय कामकाज, इतर विभागांशी संपर्क, संनियंत्रण व प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादी सोयीसाठी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, उपविभाग स्तरावर उप विभागीय कृषी अधिकारी यांची कार्यालये उघडण्यात आली. आकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ६७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३0 महत्त्वाची पदे रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, कृषी सहाय्यक, लिपिक, अनुरेखांक आदी महत्त्वाच्या पदाचा समावेश आहे. शिवाय कार्यरत असलेल्या ३७ पदापैंकी ८ जणांची बदली होऊन कार्यमुक्त झाले आहे. विशेष म्हणजे आकोट तालुका कृषी अधिकारी साळी व उपविभागीय कृषी अधिकारी गायकवाड हेसुद्धा बदली होऊन कार्यमुक्त झाले; परंतु त्याच्या जागी अद्याप कोणी रुजू झाले नाही. शेतकर्यांच्या सुलभ संपर्कासाठी आवश्यक असलेले कृषी सहायक भोई, डोईफोडे, कुमावात, बाजाड, राजनकर, निमकर, करवते मालसुरे यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे; परंतु त्याच्या जागी अद्याप बदलीवर आलेले कृषी सहाय्यक व अधिकारी हे रुजू झाले नाहीत. त्यामुळे उर्वरित कर्मचार्यांना अतिरिक्त प्रभार सांभाळावा लागत असल्याने शेतकर्यांच्या कामांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. सुधारित तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकर्यांपर्यंत पोचवण्यासाठी आखलेल्या पीक प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटी, प्रचारसभा, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी विभागावर आहे. पाऊस पडत नसल्यामुळे त्यांना योग्य मार्गदर्शन करीत जनजागृती करण्याची जबाबदारी तालुका कृषी कार्यालयाची आहे; परंतु कृषी कार्यालयातच रिक्त असलेल्या पदाचा दृष्काळ पडल्यामुळे शेतकर्यांना मार्गदर्शन कसे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
** आकोट नकोच!
आकोट येथे तालुका कृषी कार्यालयात काम करण्यास कोणताही अधिकारी-कर्मचारी उत्सुक दिसत नाही. माहितीचे अधिकार, निर्थक तक्रारी यामुळे कार्यालयातील अधिकारी वैतागले आहेत. त्यामुळे एकंदरीत वातावरण पाहता अनेक कर्मचार्यांनी येथून काढता पाय घेतला. शिवाय बदलीवर आलेले कर्मचारीसुद्धा आकोट नको म्हणत पर्यायी व्यवस्था शोधत आहे. आकोट येथे तालुका कृषी अधिकारी साळी वगळता कायमस्वरूपी एकही अधिकारी जास्त काळ टिकला नाही.