पाऊस आला; पण सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 02:11 PM2018-08-19T14:11:35+5:302018-08-19T14:13:46+5:30
अकोला : सव्वा महिन्याच्या दीर्घ खंडानंतर पाऊस आला; पण मुरमाड जमिनीतील सोयाबीन पिकांचे २० टक्के नुकसान झाले असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. काळ्या भारी जमिनीतील पिके मात्र या पावसाने तरली आहेत.
विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ९० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत; पण नागपूर विभाग पीछाडीवर आहे. या विभागात ७१ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. या विभागात सर्वात जास्त सहा लाखांवर धानाचे क्षेत्र आहे; पण सव्वा महिना पावसाने दीर्घ दडी मारल्याने भाताची (धान) चिखलणी व रोवणी रखडली होती; पण आता दमदार पाऊस झाल्याने धान पिकांच्या चिखलणी, रोवणीस सुरुवात होईल. उत्पादनावर काही अंशी परिणाम होण्याची शक्यता आहे. अमरावती विभागात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक १४ लाख हेक्टरवर झाली आहे; पण पावसाने दडी मारल्याने मुरमाड जमिनीतील सोयाबीन पिकाने मान टाकली होती. बहुतांश भागात हे पीक करपले होते, तसेच ज्या ठिकाणी सोयाबीन फुलावर होते, त्यावेळी पाऊस न आल्याने अशा ठिकाणचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या तूर पीकही उत्तम आहे. पाऊस उशिराने आल्याने किडींना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढला आहे.
- विदर्भात पावसाने दडी मारल्याने मुरमाड जमिनीतील पिकांवर अल्पसा परिणाम झाला होता. जेथे सोयाबीन फुलांच्या अवस्थेत होते, तेथे त्यावेळी पाणी न मिळाल्याने तेथे सोयबीनचे २० टक्केपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता आहे. आता तीन दिवसांपासून दमदार पाऊस होत असल्याने पूर्व विदर्भातील धान पिकाला संजीवनी मिळाली आहे.
डॉ. मोहन खाकरे,
कृषी विद्यावेत्ता,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.