Rain: अकोला जिल्ह्यात मुसळधार, कानडी परिसरात गारपीट
By रवी दामोदर | Published: September 11, 2022 02:37 PM2022-09-11T14:37:12+5:302022-09-11T14:37:12+5:30
Akola: हवामान विभागाच्या अंदाजानुसार विश्रांती घेतलेला पाऊस जिल्ह्यात पुन्हा सक्रीय झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.
-रवी दामोदर
अकोला: हवामान विभागाच्या अंदाजानुसार विश्रांती घेतलेला पाऊस जिल्ह्यात पुन्हा सक्रीय झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी परिसरात वादळीवाऱ्यासह गारपीटही झाली. मुसळधार झालेल्या पावसाचा खरीप हंगामातील पिकांना फटका बसला असून, शेतकरी अडचणीत आला आहे.भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने सुरूवात केली. वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह धुव्वाधार पाऊस झाला. दरम्यान, मूर्तिजापूर तालुक्यातील कानडी शिवारात गारपीटही झाली. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात मुसळधार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. काही भागातील वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती आहे.
जिल्ह्याला तीन दिवस येलो अलर्ट
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्याला दि.१४ सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट मिळाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पाऊस पिकांसाठी पोषक असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दोन-तीन दिवसांपासून उष्णतेने त्रस्त असलेल्या अकोलेकराना दिलासा मिळाला.
निंबा परिसरात शेतशिवार जलमय
बाळापुर तालुक्यातील निंबा फाटा परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने शेत शिवार जलमय दिसून आले. तसेच निंबा फाटा ते काजिखेड या मार्गावर वादळ वाऱ्यामुळे दोन ते तीन झाडे पडले होते. दरम्यान शेतात पाणी साचल्याने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.