‘अवकाळी’चा अकोला जिल्ह्यात १७२८ हेक्टरवरील पिकांना फटका
By राजेश शेगोकार | Published: March 19, 2023 08:17 PM2023-03-19T20:17:28+5:302023-03-19T20:18:13+5:30
तेल्हारा तालुक्यात १२०० हेक्टर क्षेत्र बाधित: सर्व्हे करण्याची मागणी
राजेश शेगाेकार, अकोला: गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पातूर, बार्शीटाकळी व तेल्हारा तालुक्यात अवकाळी पावसासह गारांचा वर्षाव झाला असून, त्यामुळे तब्बल १ हजार ७२८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असल्याने पंचनामे रखडले आहेत. नुकसानग्रस्त भागात अधिकाऱ्यांनी पाहणी केली असली तरी, कागदोपत्री काहीच अहवाल घेतला नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता.
त्यानुसार, जिल्ह्यात अवकाळी पावसाने पातूर, बार्शीटाकळी तालुक्यासह ग्रामीण भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. तसेच दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाच्या गारांनी पातूर तालुक्याला झोडपले. पातूर तालुक्यातील पांगरताटी, आलेगाव, उंमरवाडी, पिंपरडोली, राहेर, उमरा आदी गावांमध्ये गारा पडल्या. तर इतर भागात जोरदार पाऊस झाला. रविवारीही रिमझिम पाऊस सुरूच होता. अवकाळी पावसामुळे तेल्हारा, पातूर व बार्शीटाकळी तालुक्यातील १७२८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वीच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. त्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी थांबत नसल्याचे चित्र आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
११८४ शेतकऱ्यांचे नुकसान
प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे १ हजार १८४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात अधिकारी, लोकप्रतिनिधींकडून पाहणी केली जात आहे; मात्र कागदोपत्री काहीच अहवाल घेतला जात नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
असे झाले नुकसान
तालुका - बाधित क्षेत्र
तेल्हारा - १२०० हेक्टर
पातूर - ३७४ हेक्टर
बार्शीटाकळी - १५४ हेक्टर
भंडारज बु. परिसरात लिंबू, भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान
सतत दोन दिवसांच्या पावसामुळे व वाऱ्यामुळे पातूर तालुक्यातील भंडारज बु. व भंडारज खु . या गावातील रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, हायब्रीड ज्वारी, फळबाग, लिंबू पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरात सर्व्हे करून मदत देण्याची मागणी रवींद्र खेकडे, नयन अमानकर, दीपक शेंडे, संजय उजाडे, गणेश म. शेंडे, नंदू ठाकरे, गजानन राऊत, अक्षय भागे, दीपक इंगळे, बाबुलाल सुरवाडे, सुधाकर गव्हाळे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे.