पाऊस धुवाधार; तेल्हारा तालुका ‘जलमय’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:40+5:302021-07-24T04:13:40+5:30
तेल्हारा : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून, शुक्रवार, दि. २३ जुलै रोजी सकाळपासून पावसाने रौद्ररूप ...
तेल्हारा : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू असून, शुक्रवार, दि. २३ जुलै रोजी सकाळपासून पावसाने रौद्ररूप धारण केले होते. शुक्रवारी धुवाधार पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत होते, तसेच संपूर्ण तालुकाच जलमय झाला होता. शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी शिरले. पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. निंबोळी येथे भिंत कोसळून तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला, तर आठ घरांचे अंशतः नुकसान झाल्याची माहिती आहे. तालुक्यातील नदी, नाल्यांना अचानक सकाळी पूर आला. यामध्ये शहरातील गौतमा नदीला पूर आला असता पाणी आठवडी बाजार, गाडगेपुरा, राधेनगर, बसस्थानक परिसरात पाणी शिरले. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पाणी शिरले.
---------------------------
-तेल्हारा-पाथर्डी-अकोट मार्गावरील रानेगाव फाट्याजवळील नाल्यावरील मोरी वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
-वाडी अदमपूर येथील नागझरी नदीला, तर मनब्दा येथील विद्रुपा नदीला तसेच तेल्हारा वरवट या रस्त्यावरील शेरी नाला, वरवट येथील धडाव नाल्याला पूर आल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला होता.
-अडगाव व शिरसोली येथील आस नदी व नाल्याला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. वाण नदीलाही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.
-----------------
तीन बकऱ्या, आठ घरांचे झाले नुकसान
निंबोळी येथील कैलास दामोदर यांची भिंत पडून तीन बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सातकाबाद, भांबेरी, मनब्दा, चिपी, निंबोळी या ठिकाणी आठ घरांचे नुकसान झाले आहे. विद्रुपा नदीच्या काठच्या शेतात शिरले पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानाचा सर्व्हे करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी दिली.
----------------------------
जलयुक्त शिवार अभियान आले कामी
शहरातील गौतमा नदीचे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत खोलीकरण व रुंदीकरण झाल्याने शहरातील नदी काठच्या रहिवाशांना पुराचा तडाखा बसला नाही. मागील गेली अनेक वर्षे पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना नगर परिषद शाळेत व सभागृहात प्रशासनामार्फत हलविले जात होते. याचे श्रेय स्थानिक जनतेने महसूल विभागाचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे व तहसीलदार सचिन पाटील व महसूल विभागाला दिल्याची चर्चा होती.
-------------------------
वाण धरणात ४१ टक्के जलसाठा
वाण धरणाच्या जलसाठ्यात वेगाने वाढ होत असून, ४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाची आतील खोली लहान असून, वरचा जलसाठा विस्तार मोठा आहे. त्यामुळे आता यापुढे यापेक्षाही मोठ्या प्रमाणात पाणी येत असले, तरी झपाट्याने वाढ होणार नाही, अशी माहिती वाण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी भांगडिया यांनी दिली.