शहरातील सखल भागात साचले पावसाचे पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:16+5:302021-07-24T04:13:16+5:30
अकोला : पावसाचा जोर कायम असल्याने, शहरातील विविध सखल भागात शुक्रवारी पावसाचे पाणी साचले. अंतर्गत रस्तेही जलमय झाल्याने वाहतुकीला ...
अकोला : पावसाचा जोर कायम असल्याने, शहरातील विविध सखल भागात शुक्रवारी पावसाचे पाणी साचले. अंतर्गत रस्तेही जलमय झाल्याने वाहतुकीला खोळंबा निर्माण होत आहे.
२१ जुलै रोजी रात्रभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला. अकोला शहरासह जिल्ह्यातील चार तालुक्यात अतिवृष्टी झाली. नदी -नाल्यांना पूर आल्याने , शेकडो घरात पुराचे पाणी घुसले. शुक्रवार, २३ जुलै रोजी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अकोला शहरातील विविध सखल भागात पावसाचे पाणी साचले. रस्त्यांवरून पावसाचे पाणी वाहत असून, रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके साचले. त्यामुळे अंतर्गत रस्ते जलमय झाले असून, त्यामधून वाहनधारकांना वाट काढावी लागत आहे. त्या अनुषंगाने शहरातील अंतर्गत भागात वाहतुकीला खोळंबा निर्माण होत आहे.
निवासी भागात तलावांचे स्वरूप ; घराबाहेर पडणार कसे?
शहरातील मनपा हद्दवाढीत समाविष्ट भागासह पाण्याचा निचरा होत नसलेल्या विविध निवासी भागात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे निवासी भागात अनेक ठिकाणी तलावांचे स्वरूप आले आहे. घरांच्या आजूबाजूला पावसाच्या पाण्याचे मोठ-मोठे डबके साचल्याने, घराबाहेर पडणार कसे, याबाबतच्या समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
.......फोटो..….