विदर्भातील ५ जिल्ह्यात पावसाची तूट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 03:06 PM2019-07-31T15:06:51+5:302019-07-31T15:06:57+5:30
अकोला: अर्धा पावसाळा संपत आला तरी विदर्भात दमदार पाऊस झाला नसून, ५ जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे.
अकोला: अर्धा पावसाळा संपत आला तरी विदर्भात दमदार पाऊस झाला नसून, ५ जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. तर पाच जिल्ह्यात सामान्य (नॉर्मल) पाऊस झाला आहे. पिकांना हा तुरळक पाऊस पोषक ठरत असला तरी बऱ्याच धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. उर्वरित धरणाचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. बुलडाणा जिल्ह्याने मात्र यावर्षी सरासरी गाठली आहे.
विदर्भात उशिरा २३ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर पावसाने दडी मारली ती २६ जुलै रोजी पुन्हा पावसाला सुरुवात झाली; परंतु पावसात जोर नसल्याने पाच जिल्ह्यात पावसाची तूट निर्माण झाली आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात ४३ टक्के सर्वाधिक तूट आहे. त्या खालोखाल वाशिम जिल्ह्यात ३६ टक्के, गोंदिया ३५ टक्के, भंडारा ३० टक्के तर वर्धा जिल्ह्यात २३ टक्के आहे. इतर पाच जिल्ह्यात नॉर्मल पाऊस असला तरी ही तूटच आहे. यामध्ये नागपूर १३ टक्के, अमरावती १८ टक्के, अकोला १३ टक्के, चंद्रपूर १२ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्यात ९ टक्के तूट आहे; परंतु हवामानशास्त्र विभागाच्या दृष्टीने हा नॉर्मल पाऊस आहे.
बुलडाणा जिल्ह्यात गतवर्षी सर्वात कमी पाऊस झाल्याने धरणाचा जलसाठा आटला होता. जवळपास गावामंध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. तथापि, यावर्षी पावसाने सरासरी गाठली आहे; परंतु धरणात जलसाठा संचयित होण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. अकोला जिल्ह्यात १३ टक्के नॉर्मल पाऊस असला तरी ही तूटच आहे. या जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस पडला नसल्याने एकही धरणात अपेक्षित जलसाठा संचयित झाला नाही. तीन मध्यम प्रकल्पाचा साठा शून्य टक्के असून, ८ लाख अकोलकरांची तहान भागविणाºया काटेपूर्णा धरणात केवळ ३५ दिवस पुरेल एवढाच ३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती विभागात ९ मोठे सिंचन प्रकल्प आहे. यातील अप्पर वर्धा प्रकल्पात १५.९३ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. पूस प्रकल्पात २०.९३ टक्के, अरुणावती ९.५७ टक्के, नळगंगा ९.३६ टक्के तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणाचा साठा शून्य टक्के आहे.