जिल्ह्यात तुरळक पाऊस; पेरण्यांना सुरुवात
By admin | Published: July 4, 2017 02:47 AM2017-07-04T02:47:20+5:302017-07-04T02:47:20+5:30
शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षेत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: तीन दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी तुरुळक स्वरू पाचा पाऊस बरसत असून, काही ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. अकोला तालुका पेरणीत मागे होता. या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे; परंतु मूग, उडिदाची पेरणी हातची गेली आहे.
जिल्ह्यातील ४ लाख ८६ हजार ६०० हेक्टरसाठी कृषी विभागाने विविध खरीप पिकांचे नियोजन केले आहे. गेल्यावर्षी जवळपास २ लाख ३० हजार हेक्टरवर सोयाबीन, तर १ लाख २० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा केला होता. यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनची मागणी वाढली असली, तरी शेतकऱ्यांनी सध्यातरी कापसाचीच पेरणी केली आहे. यावर्षी २ लाख १५ हजार हेक्टरवर कृषी विभागाने सोयाबीनचे नियोजन केले आहे.
दरम्यान, यावर्षी तूर ७० हजार हेक्टर, मूग ३१ हजार हेक्टर, उडीद २० हजार हेक्टर, ज्वारी २२,५०० हजार हेक्टर, बाजरी २२५ हजार हेक्टर, मका ३५० हजार हेक्टर, सूर्यफूल एक हजार हेक्टर, तर तिळाचे १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील या विविध पिकांसाठी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यासाठी ७३ हजार ५०४ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून, ३४ हजार ५९७ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली आहे.