आलेगाव येथे पावसाचा तडाखा
By admin | Published: June 11, 2017 02:34 AM2017-06-11T02:34:52+5:302017-06-11T02:34:52+5:30
शेती खरवडून गेली: २५ मेंढय़ांचा मृत्यू; वीज पडून म्हैस ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
आलेगाव : परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या तुफान पावसाचा तडाखा बसला. ढगफुटीसारख्या झालेल्या या पावसामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जांब येथे शेती खरवडून गेली, तर शेतात असलेल्या २५ मेंढय़ा व काही कोंबड्यांचा मृत्यू झाला. पावसाचा जोर जास्त असल्याने अनेक शेतकर्यांनी टाकलेले बांध फुटले. दरम्यान लसनापूर येथे वीज पडून म्हैस ठार झाल्याची घटना घडली आहे.
या वर्षी पिकाला भाव नसल्यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. या वर्षी वेळेवर वरुणराजाचे आगमन होईल, या आशेने शेतकर्यांनी मेहनत करून शेताची मशागत केली; परंतु मान्सूनपूर्व पावसाने ढगफुटीसारखा पाऊस दोन तास पडल्याने नदी-नाले एकत्र झाले व मोठा पूर आला. यापूर्वी २00६ साली असा पूर आला होता. या पावसाने चोंढी शिवार, जांबमध्ये आणि आलेगाव परिसरात खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्यामध्ये मोठ-मोठे बांध टाकलेले वाहून गेले, शेतामध्ये असलेल्या शेंगांचे ढीग वाहून गेले, कांदा साठविल्या ठिकाणीसुद्धा पाणीच पाणी झाले. तसेच काही शेतकर्यांनी शेतात मेंढय़ा व कोंबड्या बसवलेल्या आहेत. जोरदार पावसामुळे २५ मेंढय़ा व काही कोंबड्यांचा मृत्यू झाला. कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यातच या पावसामुळे कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तसेच गावाला लागून असलेल्या लेंडी नाला अरुंद झाल्यामुळे पाणी लोकांच्या घरात शिरल्याने त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
बस स्थानकावर असलेल्या जैन कृषी सेवा केंद्रात पाणी शिरल्याने खते, बियाणे भिजल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. तसेच जनरल स्टोअर्स, पानटपरी, चहा हॉटेल, कापड दुकान, फ्रूटचे दुकान आदींमध्येही पाणी शिरल्याने नुकसान झाले. परिसरात झालेल्या नुकसानाचा तलाठय़ांनी सर्व्हे सुरू केला.