परतीच्या पावसाने राज्यातील जलसाठय़ात वाढ!
By admin | Published: September 24, 2015 01:03 AM2015-09-24T01:03:59+5:302015-09-24T01:03:59+5:30
पश्चिम विदर्भातील स्थिती चिंताजनकच.
अकोला: परतीच्या पावसाने राज्यातील धरणांच्या जलसाठय़ात अल्पशी वाढ झाली आहे; परंतु मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात अद्याप पूरक पाऊस झाला नसल्याने या दोन्ही विभागासह कोकण, नाशिक, पुणे व राज्यातील इतर भागाला दमदार परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील धरणांच्या जलसाठय़ात आजमितीस ५४ टक्के जलसाठा आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर निर्माण होईलच, शिवाय यावर्षी सिंचनालाही पाणी मिळणार नाही. परतीच्या पावसाचे दिवस सुरू झाल्यावर पाऊस प्रणाली पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसला. चार महिन्यांच्या पावसाळ्य़ा प्रथमच काही भागात नदी, नाले दुथडी भरू न वाहून गेले. लहान-मोठय़ा धरणांच्या जलसाठय़ात वाढ झाली, सिमेंट नाला बांध, लघू पाटंबधार्यात पाणी संचय झाला. मराठवाडा विभागात केवळ ३४.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) आणि पश्चिम विदर्भातील धरणसाठय़ात ७0.२९ अब्ज घनफूट जलसाठा आहे; परंतु मराठवाड्यातील काही जिल्हे व अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या जिल्हय़ातील धरणांच्या जलसाठय़ाची स्थिती तेवढी समाधानकारक नाही; या तीन जिल्हय़ात सरासरी ३५ ते ४0 टक्के जलसाठा आहे. अमरावती विभागातील सर्व प्रकारच्या ६४0 प्रकल्पांत ७0.२९ अब्ज घनफूट (टीएमसी) जलसाठा आहे. या विभागात ९ मोठे सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत ३८.२३ अब्ज घनफूट (७८ टक्के), २३ मध्यम प्रकल्पांत १५.६४ अब्ज घनफूट (६७ टक्के), ४२८ लघू प्रकल्पात १५.३६ अब्ज घनफूट म्हणजेच ५0 टक्के जलसाठा आहे. नागपूर विभागात सर्व प्रकल्प मिळून १११.८८ अब्ज घनफूट (७९ टक्के) जलसाठा आहे. मराठवाड्यातील उजणी धरणात मृत जलसाठा होता, यामध्ये अल्पशी वाढ झाली आहे. कोयना धरणात ७५ टक्के जलसाठा आहे. पुणे आणि नाशिक विभागातही पूरक पाऊस झाला नसल्याने या विभागात आजमितीस केवळ ५१ टक्के जलसाठा आहे. दरम्यान, मराठवाडा विभागात ३४.३५ अब्ज घनफूट, कोकण विभाग ५१.६९ अब्ज घनफूट, नागपूर विभागात ७0.२९ अब्ज घनफूट, नाशिक विभाग ८५.८६ अब्ज घनफूट, पुणे १९५.६६ अब्ज घनफूट व राज्यातील इतर प्रकल्पात १८३.१४ अब्ज घनफूट जलसाठा आहे. राज्यात आजमितीस केवळ ५४ टक्के जलसाठा आहे. काटेपूर्णा प्रकल्पाची एकूण पातळी (साडेतीन टीएमसी) अब्ज घनफूट आहे. एक टीएमसी म्हणजे २८.३२ दलघमी; परंतु काटेपूर्णा धरणात २५.३0 दलघमी जलसाठा आहे. म्हणजेच एक टीएमसीदेखील या धरणात पाणी नाही. इतर प्रकल्पात पाणी साठा अल्प आहे. त्यामुळे परतीच्या दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे अकोला येथील पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट के ले.