राज्यात सरासरी ९५ टक्के पावसाचा अंदाज!
By admin | Published: June 2, 2015 01:21 AM2015-06-02T01:21:36+5:302015-06-02T01:21:36+5:30
कृषी हवामानशास्त्र विभागाचे भाकीत; अकोला जिल्हय़ात ९६ टक्के पाऊस, पाऊस वेळेवर?
अकोला : कृषी हवामानशास्त्रानुसार राज्यात यंदा सरासरी ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून, पावसाला वेळेवर सुरुवात होण्याचा अंदाज आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची आद्र्रता, वार्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निक षावर आधारित आहे. यंदा एलनिनोचा प्रभाव राहणार असल्याने जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी हा अंदाज वर्तविला आहे. प्रत्येक विभागातून या संबंधीची सूक्ष्म माहिती गोळा केल्यानंतर, १ जून २0१५ रोजी त्यांनी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाचे भाकीत केले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भात सरासरी ९६ टक्के पावसाची शक्यता असून, अकोला येथे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी ६८३.७ मि.मी., तर साधारण ६५६ मि.मी. पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य विदर्भात ९७.५ टक्के पाऊस होईल. नागपूर येथे सरासरी ९५८ मि.मी. म्हणजेच १00 टक्के पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ येथे सरासरी ८४२, तर साधारण ८४0 मि.मी. पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात ९२ टक्के पाऊस होईल. शिंदेवाही (चंद्रपूर) येथे सरासरी ११९१ मि.मी., तर साधारण ११00 मि.मी. पावसाचा अंदाज आहे. यंदा एलनिनोचा प्रभाव असून, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमान व वार्याचा वेग कमी आढळल्याने मान्सूनचे आगमन वेळेत होत असले तरी पुढे अडथळा येण्याची शक्यता आहे. यंदा वेळेवर पावसाळा सुरू होण्याची शक्यता असूून, राज्यात सरासरी ९५ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. तथापि, कमी दिवसात अधिक पाऊस आणि बराच काळ पावसाचा खंड असे हवामान राहण्याची दाट शक्यता महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली.