अकोला जिल्ह्यात तिस-या दिवशीही पाऊस
By Admin | Published: March 12, 2015 01:45 AM2015-03-12T01:45:17+5:302015-03-12T01:48:13+5:30
आलेगाव परिसरात गारपीट; मूर्तिजापूर, बाळापूर तालुक्यात पावसाच्या सरी
अकोला: जिल्ह्यात बुधवारी पहाटे पुन्हा पाऊस झाला. मूर्तिजापूर, पातूर शहर आणि बाळापूर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. अकोला शहरातसुद्धा रात्री ७.४५ वाजतानंतर वादळी वार्यासह पाऊस कोसळला.
मूर्तिजापूर, बाश्रीटाकळी तालुक्यात सोमवारी आणि मंगळवारी अवकाळी पाऊस झाला होता. मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम, मधापुरी, माटोडा, नवसाळ, रामटेक, जामठी, मंडुरा, वडगाव, कार्ली, बोरगाव निंघोट, अकोली जहॉंगीर, धामोरी, कवठा, खिनखिनी व राजुरा घाटे या गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. काही ठिकाणी लिंबाच्या आकाराच्या गाराही पडल्या होत्या. बुधवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. मूर्तिजापूर आणि पातूर शहरात सकाळी ११ वाजताच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. पातूर येथे जोरदार हवाही सुटली होती. त्यामुळे काहीवेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. बाळापूर तालुक्यातील कान्हेरी गवळी परिसरात सकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मूर्तिजापूर, पातूर आणि बाळापूर तालुक्यात बुधवारी अल्प पाऊस झाला असला, तरी शेतकरी धास्तावले आहेत. शेतात गहू व हरभरा पीक असून, काहींच्या फळबागाही आहेत. कधीही अवकाळी पाऊस कोसळू शकतो, असे वातावरण आहे. त्यामुळे शेतकर्यांनी गहू आणि हरभरा पीक काढण्यास सुरुवात केली आहे.