वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; ढोरखेड्यात घरांची पडझड

By admin | Published: September 18, 2015 12:21 AM2015-09-18T00:21:35+5:302015-09-18T00:21:35+5:30

एका महिलेचा मृत्यू; बेघरांना जिल्हा परिषद शाळेत हलविले.

Rainfall in Washim district; Downfall of the house in the store | वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; ढोरखेड्यात घरांची पडझड

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; ढोरखेड्यात घरांची पडझड

Next

वाशिम : गत एका महिन्यांपासून फितूर झालेला पाऊस १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजतानंतर वाशिम जिल्ह्यात सर्वदूर बसरला. या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, वादळवारा आणि पावसामुळे मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील ३0 ते ३५ घरांची पडझड झाली असून सात ते आठ जण जखमी झाले आहेत. एका जखमीचा उपचारादरम्यान रात्री उशीरा मृत्यू झाला. सखुबाई कुंडलिक सावळे असे मृतक महिलेचे नाव आहे. मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या अपेक्षा उंचाविल्या होत्या. या पावसाच्या भरोशावर शेतकर्‍यांनी तातडीने पेरण्या आटोपल्या. २९ जूनपर्यंत पावसाने कमी-अधिक प्रमाणात सातत्य राखले. २९ जूननंतर रिमझिम पावसाचा अपवाद वगळता दमदार पाऊस झाला नाही. त्यानंतर ४ ते ८ ऑगस्टदरम्यान पावसाने हजेरी लावून परत दीर्घ रजा घेतली. तेव्हापासून गायब झालेला पाऊस १५ सप्टेंबरपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात बरसत आहे. १५ सप्टेंबरला रात्रीदरम्यान जिल्ह्यात ११.७७ च्या सरासरीने एकूण ७0.६0 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. रिसोड तालुक्यात ३८ मीमी, मालेगाव तालुका १८.२0 मीमी, मंगरुळपीर तालुका १,४0 मीमी व मानोरा तालुक्यात १३ मीमी पाऊस पडला होता. बुधवारी उसंत देणार्‍या पावसाने गुरूवारी दुपारनंतर दमदार हजेरी लावली. सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस असल्याने बळीराजा सुखावला आहे. सुकून जाणार्‍या सोयाबीनला या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा अशा सर्व तालुक्यात गुरूवारी दुपारच्या सुमारास सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस झाल्याने चिंतेत असणार्‍या शेतकर्‍यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे जलाशयांमधील जलसाठय़ात वाढ होण्याचा अंदाज जलसिंचन विभागाने वर्तविला आहे. रिसोड व मालेगाव तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने रब्बी पिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रात्री ७ वाजतानंतर पावसाचा जोर आणखी वाढला होता. अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला.

*महिला दगावली

        शिरपूर जैन येथून जवळच असलेल्या ढोरखेडा येथे वादळवारा आणि पावसामुळे घरांची पडझड झाली. गावातील बौद्ध व धनगर वेटाळातील जवळपास ३0 ते ३५ घरांची पडझड झाली. घराच्या पडझडीत सात ते आठ जण जखमी झाले. सखूबाई कुंडलिक सावळे यांच्या डोक्याला टिनपत्र्याचा जबर मार लागल्याने त्यांना वाशिम येथे उपचारार्थ हलविले. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. गावातील अमोल सावळे, बळीराम मिटकरी, नारायण सावळे यांच्यासह सात ते आठ जण जखमी असून त्यांच्यावर शिरपूरात उपचार सुरू आहे. घरांची पडझड झालेल्या नागरिकांची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाने केल्या. या कुटुंबाला खिचडी व अन्य भोजन देण्याच्या सूचनाही दिल्या. तहसीलदार सोनाली मेटकरी, तलाठी वाघ, पोलीस उपनिरिक्षक गिरीश तोगरवार, मंगेश गोपनारायण, प्रकाश भगत, मोरे आदींनी ढोरखेड्याला भेट दिली.

Web Title: Rainfall in Washim district; Downfall of the house in the store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.