पश्चिम विदर्भात पावसाने ओलांडली सरासरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 10:47 AM2021-07-26T10:47:04+5:302021-07-26T10:47:13+5:30
Rainfall in West Vidarbha exceeds average : पाच-सहा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पश्चिम विदर्भात सरासरी ओलांडली आहे.
अकोला : गत काही दिवसांपासून राज्यात दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पाच-सहा दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पश्चिम विदर्भात सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत १२९.१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या; परंतु त्यानंतर पावसाने पाठ फिरविली. जुलै उजाडला तरी पावसाचे चिन्ह दिसून येत नव्हते; मात्र ७ जुलैपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. जिल्ह्यात ७ जुलैपासून दररोज तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. कुठे तुरळक तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहे; परंतु बुधवारी २१ जुलै रोजी रात्री पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी, नाले तुडुंब झाले आहेत. प्रकल्पांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे.
सरासरी होणारा पाऊस
३४०.८ मिमी
आतापर्यंत झालेला पाऊस
४४०.१ मिमी
जूनमध्ये झालेला पाऊस
२१२.७ मिमी
जुलैमध्ये झालेला पाऊस
२२७.४ मिमी
गतवर्षीपेक्षा सहा मिमी अधिक पाऊस
यंदा उशिरा का होईना, मुसळधार पाऊस बरसत आहे. अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. गतवर्षी यावेळेला पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांत ३९४.५ मिमी म्हणजेच ११५.८ टक्के पाऊस झाला होता. यंदा १२१.१ टक्के पाऊस झाला आहे.