पावसाचे प्रमाण वाढणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:14 AM2021-06-03T04:14:46+5:302021-06-03T04:14:46+5:30
अकोला : ईशान्य मध्यप्रदेश, विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा तामिळनाडूवर असलेली द्रोणीय स्थिती आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात असलेले चक्रीय वारे ...
अकोला : ईशान्य मध्यप्रदेश, विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा तामिळनाडूवर असलेली द्रोणीय स्थिती आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात असलेले चक्रीय वारे आणि अन्य अनुकूल हवामान शास्त्रीय परिस्थितीने विदर्भात २ जूनपर्यंत वावटळीसह हलका, मध्यम पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली.
शहरात वाहतूक कोंडी
अकोला : निर्बंध शिथिल झाल्यानंतर रस्त्यांवर वाहतूक वाढली आहे. त्यामुळे शहरातील टिळक रोड, ताजनापेठ रोडवर वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. बुधवारी अशोक वाटिका ते बसस्टँड चौकात मोठी वर्दळ होती.
ग्रामीण भागावर पाणीटंचाईचे सावट
अकोला : जूनच्या सुरुवातीला ग्रामीण भागावर आता पाणीटंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. कोरोना संकटामुळे प्रशासनाचे पाणीटंचाईकडे लक्ष दिसत नाही. त्यामुळे गावागावांतील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
डिझेलच्या दरवाढीने शेतकरी चिंतित
अकोला : डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहायाने शेतीची मशागत करतात; पण आता डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मजुरांच्या हाताला मिळाले काम
अकोला : ग्रामीण भागात सध्या शेती मशागतीची कामे जोरावर असल्याने आता शेतमजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. लॉकडाऊनमध्ये काम नसल्याने या वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते.
क्रीडांगणावर संचारबंदीने शुकशुकाट
अकोला : संचारबंदीमुळे प्रत्येक क्रीडांगणात शुकशुकाट दिसून येत आहे. दैनंदिन सराव देखील बंद आहे. त्यामुळे खेळाडूंना सराव करण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणी आहे.
वाजंत्रीना आर्थिक मदत द्या
अकोला : वाजंत्री व बँड वाजविणाऱ्या लोकांचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे ठप्प झाला आहे. या व्यवसायावर जगणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.
गंजलेल्या वीज खांबांमुळे अपघाताचा धोका
अकोला : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलविण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकदा सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांकडून झाली आहे; परंतु याकडे दुर्लक्ष झाले.
खासगी शिक्षकांची चिंता वाढली
अकोला : जिल्ह्यात मोठ्या संख्येने इंग्रजी शाळा आहे. या शाळांमध्ये मोठ्या संख्येने कंत्राटी पद्धतीने शिक्षक शिकवितात; मात्र मागील वर्षी कोरोनामुळे या शिक्षकांना मोठा फटका बसला. यंदाही तशीच स्थिती दिसून येत आहे. त्यामुळे या शिक्षकांची चिंता वाढली आहे.
ऑटोचालकांना किट देण्याची मागणी
अकोला : कोरोनानंतर जिल्ह्यातील ऑटो पूर्णत: बंद पडले आहे. परिणामी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे. त्यामुळे या ऑटोचालकांना शासनाने धान्य किट द्यावी, अशी मागणी आहे.