प्रदीर्घ खंडानंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन
By रवी दामोदर | Published: September 5, 2023 11:16 PM2023-09-05T23:16:14+5:302023-09-05T23:16:28+5:30
जिल्ह्यात गत दीड महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली.
अकोला : जिल्ह्यात गत दीड महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला असून, कोमजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यात रात्रीच्या वेळी दमदार पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांच्या मशागतीला वेग येणार आहे.
खरिपाच्या पेरण्या एक महिना उशिरा प्रारंभ होऊन पेरण्या पूर्ण होताच जुलैच्या अखेरीस चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली होती. दि.५ सप्टेंबर रोजी रात्रीच्यावेळी पावसाने विजांच्या कडकडाटात दमदार हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. जिल्ह्यातील आगर, उगवा, घुसर, खरप, तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील कंझारा परिसरात जोरदार पाऊस झाला.
९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’
मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात ४.५ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्याच्या प्रभावाने ९ सप्टेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात दि. ९ सप्टेंबरपर्यंत हलका ते मध्यम, तसेच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने आगामी चार दिवस जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.