पिकांना पावसाचा बुस्टर डोस!
By admin | Published: July 14, 2017 02:03 AM2017-07-14T02:03:41+5:302017-07-14T02:03:41+5:30
बुधवारपासून हलका पाऊस; विदर्भातील दहा जिल्ह्यांत सरासरी घसरलेलीच!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बुधवारपासून विदर्भात तुरळक व हलका पाऊस सुरू असल्याने तिबार पेरणीपासून वाचलेल्या पिकांना हा बुस्टर डोस मानल्या जात आहे. ढगाळ वातावरण व हलका पाऊस या पिकांना संजीवनी घेऊन आला आहे. उर्वरित पेरणीसाठी हा पाऊस पूरक नसल्याने शेतकऱ्यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पावसाची सरासरी घसरलेलीच असून, ही आकडेवारी अमरावती जिल्ह्यात सरासरी ४२ मि.मी. पाऊस कमी आहे.
यावर्षी सार्वत्रिक दमदार पाऊस नसल्याने राज्यासह विदर्भातील पेरण्या खोळंबल्या असून, ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, त्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. विदर्भात मूग, उडीद हे महत्त्वाचे पीक आहे. मागील पाच वर्षांपासून या पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेच नाही. यावर्षी समाधानकारक पावसाचे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु योग्य वेळी पाऊस झाला नसल्याने हे पीक यावर्षीही शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे. कापूस, सोयाबीनची पेरणीची वेळही गेली आहे. १५ जुलैपर्यंत पेरणी करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञ देत असले, तरी पाऊसच नसल्याने शेतकरी पेरणार कसा, हा प्रश्न आहे. ६ जून ते १३ जुलै या कालावधीत एकदाही ७५ ते १०० मि.मी. पेरणीलायक पाऊस झाला नाही.
दरम्यान, ६ जून ते १३ जुलै या पावसाच्या कालावधीत विदर्भातील पावसाची सरासरी घसरली असून, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक ४२ मि.मी. पाऊस कमी आहे. नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या ३० मि.मी. पाऊस कमी आहे, तसेच भंडारा ३६, गोंदिया ३५, अकोला २८, यवतमाळ २३, चंद्रपूर ३८, गडचिरोली ३०, वाशिम १३ तर बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ७ मि.मी. पाऊस कमी आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यात परभणी येथे सरासरी २८ मि.मी. पाऊस कमी असून, सांगली जिल्ह्यात ३७ मि.मी., कोल्हापूर २८, औरंगाबाद १८, जालना ५, नांदेड १५, सातारा १७, रत्नागिरी ७, सिंधुदुर्ग १५ तर मुंबई शहरात सरासरी ३० मि.मी. पाऊस कमी आहे.
पावसाचा अंदाज
१४ ते १७ जुलैपर्यंत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
पावसाचा इशारा
१४ जुलै रोजी उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.