पावसाळा तोंडावर; मदत नाही!
By admin | Published: May 1, 2016 01:28 AM2016-05-01T01:28:48+5:302016-05-01T01:28:48+5:30
अकोला जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त शेतकरी हवालदिल: मदतीची प्रतीक्षा.
संतोष येलकर/ अकोला
दुष्काळी परिस्थितीत जिल्हय़ातील सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली; मात्र दुष्काळी परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्यांसाठी शासनामार्फत अद्याप मदत निधी उपलब्ध झाला नाही. पावसाळा तोंडावर आला असला तरी दुष्काळी मदतीचा पत्ता नाही. त्यामुळे दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त ९४२ गावातील शेतकर्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, नापिकीमुळे जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्हय़ातील लागवडीयोग्य एकूण ९९७ गावांपैकी ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या बाळापूर तालुक्यातील १५ आणि तेल्हारा तालुक्यातील ३५ अशी केवळ ५५ गावे गत ऑक्टोबरमध्ये शासनामार्फत दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली. या दुष्काळग्रस्त गावांसाठी शासनामार्फत मदतनिधीदेखील प्राप्त झाला. त्यानंतर खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील गावांमध्ये गत २३ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्हय़ातील ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या लागवडीयोग्य सर्व ९९७ गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. दुष्काळी जाहीर होऊन महिना उलटून गेला; मात्र दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकर्यांसाठी शासनामार्फत अद्यापही मदत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्हय़ातील ९४२ गावांमधील दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी मदत निधी अद्याप उपलब्ध झाला नाही. हवामान वेधशाळांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार आहे. त्यानुसार पावसाळा महिनाभरावर आला असून, दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्यांसमोर खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतीची मशागत, बियाणे, खतांचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी, शासनाकडून दुष्काळी मदत अद्याप मिळाली नाही. त्यामुळे दुष्काळी मदत केव्हा मिळणार, याबाबत जिल्हय़ातील दुष्काळग्रस्त गावांमधील शेतकर्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.