मृगाच्या पूर्वसंध्येला पावसाची हजेरी
By admin | Published: June 7, 2017 01:22 AM2017-06-07T01:22:59+5:302017-06-07T01:22:59+5:30
अकोला: सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाने मंगळवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाने मंगळवारी रात्री ७.३0 वाजताच्या सुमारास दमदार हजेरी लावली. वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. तासभर झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांची दिवसभराच्या उकाड्यापासून सुटका झाली.
गेल्या आठवड्यापासून नागरिकांना दमट वातावरणामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. रात्री आलेल्या पावसाने उकाड्यापासून अकोलेकरांना दिलासा मिळाला आहे. तासभर झालेल्या दमदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. सोमवारी रात्रीसुद्धा पावसाच्या सरी बसरल्याने, वातावरणात गारवा निर्माण झाला होता. पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी आनंदित झाला असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू केली आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत केली असून, शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाला सुरू झाल्यानंतर बाजारपेठेत बियाणे, खते खरेदीला वेग येईल. मंगळवारी रात्री विजेच्या कडकडाटांसह झालेल्या पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक भागात अंधार पसरला होता.