पावसाळय़ात पाणी टंचाईच्या झळा!
By admin | Published: August 1, 2015 02:06 AM2015-08-01T02:06:09+5:302015-08-01T02:06:09+5:30
पूर्णाकाठच्या लोकांची पाण्यासाठी भटकंती; गोपाळखेड योजना पाच दिवसांपासून ठप्प.
अकोला : खारपाणपट्टय़ातील १३ गावांच्या नागरिकांची तहान भागविणारी गोपाळखेड येथील पाणीपुरवठा योजना गत पाच दिवसांपासून ठप्प पडली आहे. पूर्णा नदीला भरपूर पाणी असतानाही केवळ पंप नादुरुस्त असल्यामुळे पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पूर्णाकाठच्या १३ गावांतील लोकांना भरपावसाळय़ात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अकोला तालुक्यातील गोपाळखेड येथे पूर्णा नदीवर जिल्हा परिषदेची पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेवरून परिसरातील १३ गावांतील लोकांना पाणीपुरवठा केला जातो. नदीपात्रातून पाणी खेचण्यासाठी नदीकाठावर असलेल्या ज्ॉक वेल पंप हाऊसमध्ये दोन सबर्मसिबल पंप बसविलेले आहेत. या पंपांना पर्यायी व्यवस्था म्हणून तिसरा पंप आहे. पावसाळय़ात नदीच्या पाण्यातील गाळामुळे हे पंप वारंवार नादुरुस्त होतात. या पंपांपैकी दोन पंप आधीच नादुरुस्त होते. रविवारी पर्यायी पंपही नादुरुस्त झाला. त्यामुळे योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला. परिणामी या योजनेवर अवलंबून असलेल्या गोपाळखेड, गांधीग्राम यासह १३ गावांवर भरपावसाळय़ात जलसंकट ओढावले. या भागात हातपंप, विहिरी किंवा पाण्याचा दुसरा कोणताही स्रोत नाही. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी नजीकच्या चोहोट्टा बाजार किंवा उगवा येथील विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे. सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. परंतु, शेतकर्यांना शेतात जावे की पाण्यासाठी भटकंती करावी, असा प्रश्न पडला आहे.