रायपूरच्या साखर व्यापाऱ्याची अकोल्यात २३ लाखांनी फसवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 03:27 PM2020-01-18T15:27:24+5:302020-01-18T15:32:06+5:30
खंडेलवाल याने तीन ते चार दिवसांमध्ये साखर पोहोचेल, असे त्यांना सांगितले; मात्र साखर न मिळाल्याने त्यांनी संतोष खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी टाळाटाळ सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : रायपूर येथील एका व्यापाºयाकडून साखर विकण्याच्या व्यवहारासाठी अकोल्यातील व पुण्यातील एजंटने ३५ लाख ४८ हजार रुपये घेतले होते; परंतु साखर खरेदीचा व्यवहार न झाल्यामुळे दोन्ही एजंटने ८ लाख ३७ हजार ५00 रुपये परत केले. उर्वरित रकमेची मागणी केली असता, दोन्ही एजंट रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने, अखेर कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रायपूर येथील नीरज रमेशलाल रमाजी यांच्या तक्रारीनुसार ते साखर विक्रीचा व्यवसाय करतात. बालाजी शुगर एजन्सीचे संचालक आरोपी संतोष मोहनलाल खंडेलवाल (अकोला) आणि अभय चोरडिया (पुणे) यांनी २0१४ मध्ये नीरज रमाजी यांच्यासोबत संपर्क साधून दोन टक्के कमिशन दराने साखर देत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यात तीन वेळा साखर खरेदीचा व्यवहार झाला. त्यानंतर २0१६ मध्ये संतोष खंडेलवाल याने शंभू महादेव शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज, उस्मानाबाद येथून कमी दराने साखर खरेदी करून देण्याचे सांगितले. नीरज रमाजी यांनी विश्वास ठेवून अग्रिम रक्कम ३५ लाख ४८ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. खंडेलवाल याने तीन ते चार दिवसांमध्ये साखर पोहोचेल, असे त्यांना सांगितले; मात्र साखर न मिळाल्याने त्यांनी संतोष खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी टाळाटाळ सुरू केली. तसेच संबंधित साखर कारखान्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यांनी आरोपीला रक्कम मागितली असता, आरोपीने २८ मार्च २०१७ रोजी ८ लाख ३७ हजार ५०० रुपये परत केले. त्यानंतर आरटीजीएसने २ लाख ५० हजार व धनादेश २५ डिसेंबर २०१८ ला दिला आणि उर्वरित २३ लाख ६० हजार ५०० रुपये देण्यासाठी अवधी मागितला. त्यानंतरही आरोपीकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने तक्रारदार नीरज रमाजी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना, न्यायालयाने आरोपी संतोष खंडेलवाल, अभय चोरडिया यांच्याविरुद्ध भादंवि ४२०,४०९, ३४ नुसार गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)