मतदानात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागृती करा! - विभागीय आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:50 AM2019-08-01T11:50:08+5:302019-08-01T11:50:36+5:30
अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीत दिले.
अकोला : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठकीत दिले.
मतदार याद्यांचा दुसरा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी विशेष मोहिमेच्या कामाचा आढावादेखील त्यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, उपविभागीय अधिकारी रामदास सिद्धभट्टी, रमेश पवार, डॉ. नीलेश अपार तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मान्यता प्राप्त राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय ‘बीएलए’च्या नियुक्त्या करून मतदार नोंदणीसाठी ‘बीएलओं’ना सहकार्य करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र सुस्थितीत असल्यासंदर्भात खात्री करून मतदान केंद्रात बदल करावयाचा असल्यास त्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकाºयांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात ‘ईव्हीएम’, ‘व्हीव्हीपॅट’करिता स्ट्राँग रूम व मतमोजणी कक्ष स्थापित करण्याच्या सूचना देत, आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ, संवेदनशील मतदान केंद्र, सुरक्षा व्यवस्था, मतदान केंद्र, मतदार यादी, स्विप कार्यक्रम अशा विविध विषयांचा विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. स्विप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले. या बैठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
योजनांच्या कामाचा घेतला आढावा!
शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांच्या जिल्ह्यातील कामाचा आढावा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी घेतला. त्यामध्ये वृक्ष लागवड, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, स्वच्छ भारत अभियान, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री आवास योजना इत्यादी योजनांतर्गत जिल्ह्यातील कामांसह ई-सेवा केंद्रांच्या कामकाजाचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला. या आढावा बैठकीला विविध विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.