अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा गुटखा विक्री केंद्रावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:06 PM2020-02-16T14:06:12+5:302020-02-16T14:06:46+5:30
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी अकोल्यात येत असताना, त्यांनी निमवाडीतील लक्झरी बसस्टँडजवळील एका गुटखा विक्री केंद्रावर अचानक छापा घातला
अकोला : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे शुक्रवारी सकाळी एका कार्यक्रमासाठी अकोल्यात येत असताना, त्यांनी निमवाडीतील लक्झरी बसस्टँडजवळील एका गुटखा विक्री केंद्रावर अचानक छापा घातला. यावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्री केंद्रावरून गुटख्याचा साठा जप्त केला आणि त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे अकोला येथे सहकार नेते वसंतराव धोत्रे यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी येत असताना, त्यांनी अचानक त्यांचा ताफा निमवाडी परिसरातील लक्झरी बस स्टँडजवळ थांबविला आणि तेथील मे. जामनिक कोल्ड्रिंक्स नामक पान टपरीवर जाऊन गुटखा मिळतो का, याबाबत चौकशी केली.
चौकशीदरम्यान प्रतिबंधित गुटखा मिळत असल्याचे त्यांना कळल्यावर, त्यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांसह पोलिसांना पानटपरीची झडती घेण्याचे निर्देश दिले. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व पोलिसांनी पानटपरीची झडती घेतली.
झडतीदरम्यान विविध कंपन्यांचा पान मसाला, सुगंधित तंबाखू, गुटखा, सुपारी आढळून आली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पानटपरीवरील अंदाजे ५ हजार रुपये किमतीचा गुटखा साठा जप्त केला. गुटखा विक्रेता सुरेंद्र रामराव जामनिक (३१) याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)