राजगुरूंच्या संघर्षगाथेतून अकाेल्याच्या इतिहासाला मिळणार उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:30 AM2020-12-05T04:30:19+5:302020-12-05T04:30:19+5:30
अकोला: भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शहीद भगतसिंह यांच्याबरोबर फासावर गेलेले क्रांतिवीर राजगुरू यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘हुतात्मा शिवराम राजगुरू : एक ...
अकोला: भारतीय स्वातंत्र्ययुद्धात शहीद भगतसिंह यांच्याबरोबर फासावर गेलेले क्रांतिवीर राजगुरू यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘हुतात्मा शिवराम राजगुरू : एक धगधगती संघर्षगाथा’ या मराठी वेबसिरीजच्या माध्यमातून अकाेल्याच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासाला उजाळा मिळणार आहे. ऐतिहासिक वास्तव जगासमाेर मांडण्यासाठी राजगुरूंचे नातू विलास प्रभाकर राजगुरू त्यांच्यासह पाच जणांच्या टीमने अकाेल्यातील राजगुरूंच्या वास्तव्यासह चळवळीचा धांडाेळा घेतला.
स्वातंत्र्ययुद्धात ज्या क्रांतिकारकांनी जिवावर उदार होऊन महान कार्य केले, त्यामध्ये शिवराम राजगुरू यांचे नाव अग्रस्थानी आहे. सध्याच्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख होण्याच्या उद्देशाने ओटीटी व्यासपीठाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक दस्तावेज वेबसिरीजच्या माध्यमातून समाेर येत आहे. ही वेबसिरीज म्हणजे स्वातंत्र्यचळवळीत ज्या क्रांतिकारकांनी अनन्वित अत्याचार सहन करून हसत-हसत बलिदान केले त्यांना आदरांजली अर्पण करणारी आहे. पुणे जिल्ह्यातील खेड (आताचे राजगुरूनगर) येथे जन्मलेले शिवराम हरी राजगुरू क्रांतिकारक कसे झाले, यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, अशी माहिती या निमित्ताने समाेर येत आहे. अकाेल्यातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा चिरंतन ठेवा आहे. इतिहासाच्या साेनेरी पानात अकाेल्याचा इतिहास दडलेला आहे. हा इतिहास युवकांसमाेर, नव्या पिढीसमाेर आणण्यासाठी आमची धडपड असल्याचा आशावाद टीमने व्यक्त केला.
‘राजगुरू’ वेबसिरीज मराठी, हिंदी, तमिळ, पंजाबी, तेलगू भाषेत तयार होणार आहे. याची मूळ संकल्पना-विलास राजगुरू यांची असून, लेखक- आशीष निनगुरकर आहेत तर कार्यकारी निर्माते-प्रतिश सोनवणे, कलावंत- प्रदीप कडू, प्रॉडक्शन मॅनेजर-सुनील जाधव, कॅमेरामन- सिद्धेश दळवी आदींनीही या स्थळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीही संशोधनासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली.
अकाेल्याचा ऐतिहासिक ठेवा
शहरातील बाबूजी देशमुख वाचनालयातील राजगुरूंनी वाचन केलेली जागा आणि समोरच्या गॅलरीतून फिरताना कोतवालीवर ठेवल्या जाणारी पाळत, राजराजेश्वर मंदिर परिसरातील साठे यांचा तेव्हाचा वाडा ज्यात राजगुरू स्वतः मुक्कामी होते. सावजी यांचे घर जेथे राजगुरूंनी रात्रभर झोपून सकाळी पुण्याला रवाना झाले होते, यासह विविध आठवणींना उजाळा मिळणार आहे.
——————
हेच त्रिमूर्तींना खरे अभिवादन
अनेक क्रांतिकारांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्याचे मोजमाप आपण करू शकत नाही. म्हणून या त्यांच्या विचारांचा मागोवा घेऊन वाटचाल करणे हीच या त्रिमूर्तींना खरे अभिवादन ठरेल, अशा आशावाद यांचे नातू विलास राजगुरू यांनी व्यक्त केला.