राजनापूर खिनखिनी होणार 'सुजलाम् सुफलाम्'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 06:02 PM2021-06-27T18:02:17+5:302021-06-27T18:02:24+5:30
Rajnapur to be 'Sujalam Sufalam' : नाला खोलीकरण झाल्याने व नाल्यावर सिमेंट बंधारे असल्याने हे पावसाचे पाणी त्या बंधाऱ्यामध्ये साठविल्या गेल्याने भविष्यात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.
- संजय उमक
मूर्तिजापूर :तालुक्यातील राजनापूर खिनखिनी या गावात भारतीय जैन संघटना व ग्रामपंचायत राजनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजनापुर येथील दोन नाले खोलीकरण करण्यात आले, राजनापूर परिसरात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळला. नाला खोलीकरण झाल्याने व नाल्यावर सिमेंट बंधारे असल्याने हे पावसाचे पाणी त्या बंधाऱ्यामध्ये साठविल्या गेल्याने भविष्यात शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.
पालकमंत्री बच्चु कडु यांनी दत्तक घेतले गाव म्हणून राजनापूर खिनखिनीची ओळख आहे. या गावात अनेक विकास कामांना वेग आला असून अलीकडेच गावती दोन मोठ्या नाल्याचे खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. नाला २० ते २२ फूट खोल असून सध्या नाल्यात १० ते १५ फूट पाणी साचले आहे. गत आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने राजनापूर परिसरातल्या विहिरींची पातळी एक ते दोन फुटांनी वाढली असून खरीप आणि रब्बी पिकाची चिंता या नाला खोलीकरणाने मिटली आहे. भारतीय जैन संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिल्याने, शेतकरी सुखावला आहे. भारतीय जैन संघटनेच्या 'सुजलाम् सुफलाम्' अकोला या अभियानांतर्गत राजनापूर खिनखिनी परीसरातील शेत शिवार 'सुजलाम् सुफलाम्' होणार आहे. यामुळे गावातील पाणी विहरी व विंधण विहीरीची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली असून भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी गाव सज्ज झाले आहे. राजनापूर परिसरा या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न तडीस निघाला आहे.
यासाठी भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया व जिल्हा व्यवस्थापन नितींजी राजवैद्य व पालक मंत्री बच्चू कडू यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य त्यांच्या या सहकार्याने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला आहे.
-प्रगती रुपेश कडू, सरपंच राजनापूर खिनखिनी