राजू शेट्टी - आंबेडकरांची हातमिळवणी? ६ आॅक्टोबरला मुंबईमध्ये होणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 03:45 AM2018-09-30T03:45:30+5:302018-09-30T03:46:20+5:30
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरू केली आहे
अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि भारिपचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात ६ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे बैठक होणार असून त्यात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सोलापूर येथे शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या अधिवेशनात हजेरी लावल्यानंतर शनिवारी अॅड. आंबेडकर अकोल्यात आले होते. यावेळी तुपकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
भाजपाचे कार्पोरेट करप्शन - आंबेडकर
काँग्रेसची मंडळी सत्तेत असताना सरळ खायची, त्यामुळे त्यांचा भ्रष्टाचार दिसायचा. मात्र, भाजपाचे मोदी सरकार आधी दुसऱ्याला खाऊ घालते. नंतर त्यांच्याकडून स्वत:च्या तोंडात घास भरवून घेते. भाजपाचा हा भ्रष्टाचाराचा मार्ग म्हणजे ‘कार्पोरेट करप्शन’आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सोलापुरातील मेळाव्यात केली.