‘वंचित’सोबत येण्याचा निर्णय राजू शेट्टींनी घ्यावा - प्रकाश आंबेडकर
By atul.jaiswal | Published: June 4, 2019 01:49 PM2019-06-04T13:49:21+5:302019-06-04T15:45:33+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. याबाबतचा निर्णय मात्र सर्वस्वी त्यांनीच घ्यावा, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत येण्याचे आमंत्रण आम्ही त्यांना दिले होते; परंतु त्यांनी काँग्रेस आघाडीला प्राधान्य दिले. आता विधानसभा निवडणुकीत त्यांना आमच्यासोबत यायचे असेल, तर त्याबाबतचा निर्णय त्यांनी घ्यावा, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे सांगितले.
‘वंचित’मुळे पराभव झाल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते. त्यासंदर्भात छेडले असता, प्रकाश आंबेडकर म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची बोलणी सुरू होती, त्यावेळी आम्ही राजू शेट्टींना वंचित सोबत येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु त्यांनी काँग्रेस आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले. त्यामुळे आम्ही हातकणंगले मतदारसंघात वंचितचा उमेदवार उभा केला. त्या ठिकाणी राजू शेट्टी यांचा पराभव कोणामुळे झाला, याचे विश्लेषण मी करत नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे. याबाबतचा निर्णय मात्र सर्वस्वी त्यांनीच घ्यावा, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.