राखीचा बाजार फुलला; मात्र पावसाचा व्यत्यय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 10:55 AM2021-08-21T10:55:03+5:302021-08-21T10:55:19+5:30
Rakhi market flourished in Akola : सण दोन दिवसांवर आलातरी ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.
- सागर कुटे
अकोला : येत्या २२ ऑगस्ट राेजी रक्षाबंधन असल्याने भावांसाठी बहिणींची राख्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. यावर्षी राख्यांच्या भावात क्वचितच वाढ झाली आहे; मात्र सण दोन दिवसांवर आलातरी ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. यामध्येही पावसाचा व्यत्यय निर्माण होत आहे.
कोरोनाच्या निर्बंधामुळे शहरातील व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत; मात्र आता निर्बंध शिथिल झाले असून बाजारात वर्दळही वाढली आहे. त्यात राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी थोडीफार कमाईची संधी चालून आली आहे. भावा बहिणीच्या प्रेमाचा राखी पाैर्णिमा सण दोन दिवसांवर आला तरी पाहिजे त्या प्रमाणात शहरात दुकाने थाटलेली दिसून येत नाहीत. काही दुकाने लागली असून बाहेरगावी असलेल्या भावासाठी बहिणी राखी घेत आहेत.
कार्टून राख्यांचे विशेष आकर्षण
रक्षाबंधनानिमित्त बाजारात विविध रंगांच्या व लहान मुलांसाठी विशेष कार्टूनच्या राख्या विक्रीस आल्या आहेत. यामध्ये सिल्व्हर, गाेल्डन काेट असलेल्या राख्या महाग असल्यातरी दिसण्यास आकर्षक असल्याने बहिणी आपल्या भावांसाठी त्या खरेदी करताना दिसून येत आहेत. बालके विविध कार्टूनच्या राख्यांना पसंती देत असल्याचे चित्र शहरातील दुकानांवर दिसून येत आहे. तसेच बाजारात गाेंडा राखी, राजस्थानी राखी, रेशीम राखी, स्पायडरमॅन, मिकीमाऊस, डोनाल्ड डक, स्टोन राखी, डिस्को लाईट, जू जू वंडरबॉय राख्यांचा समावेश आहे.
बाजारात देव राख्यांचे भाव दुप्पट
मानाची राखी म्हणून ओळख असलेल्या ‘देव’ राख्यांचेही भाव माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. दोन ते अडीच रुपये डझनने मिळणाऱ्या राख्यांची किंमत दुप्पट झाली असून काही ठिकाणी ५ रुपये तर कुठे ६ रुपये डझनने विकत घ्यावी लागत आहे. विशेष म्हणजे या राख्या देव पूजनासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात.
राखी विक्रेते म्हणतात...
यंदा राखींच्या किमतीत कुठलीही वाढ झाली नाही; मात्र देव राखीच्या किमतीत थोडीफार वाढ झाली आहे. निर्बंध शिथिल झाल्याने काही प्रमाणात फायदा झाला.
- गिरधारी प्रजापत
दोन दिवसांवर रक्षाबंधनाचा सण आला आहे. सध्यातरी दुकानांवर रेलचेल वाढली आहे. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. उद्या आणखी गर्दी राहील.
- जगदीश डोंगरे
राख्यांमध्ये भाववाढ झाली नाही. गतवर्षीही काेराेनामुळे राखीचा व्यवसाय होऊ शकला नाही. यंदातरी ग्राहकांची गर्दी आहे. कार्टून राखीकडे लाेकांचा कल आहे.
- शिवम गुजराती
गतवर्षी लॉकडाऊनमुळे व्यवसायात अडचणी आल्या होत्या. यंदा चांगला प्रतिसाद आहे; मात्र पावसाचा वारंवार व्यत्यय येत आहे. पाऊस थांबल्यास व्यवसायाला चालना मिळेल.
- धवल प्रजापत