रामेश्वर पवळ शिवसेना शिंदे गटाच्या समन्वयकपदी
By राजेश शेगोकार | Published: April 22, 2023 04:25 PM2023-04-22T16:25:50+5:302023-04-22T16:26:49+5:30
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळविलेले रामेश्वर पवळ यांनी आता शिवसेना शिंदे गटाचा हाथ धरला आहे.
राजेश शेगोकार, अकोला: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान मिळविलेले रामेश्वर पवळ यांनी आता शिवसेना शिंदे गटाचा हाथ धरला आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणाऱ्या रामेश्वर पवळ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या समन्वयकपदाची जबाबदारी दिली आहे. सध्या राज्यातील राजकारण ‘पवार’ यांच्या अवतोभोवती फिरत असून, त्यात त्यांचे विश्वासू मानल्या जाणारे पवळ यांनी शिंदे गटात उडी घेतल्याने आगामी काळात पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वंजारी समाजाचे विदर्भातील नेते असलेल्या पवळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून तब्बल २२ वर्षे काम केले. अकोला, बुलडाणा, वाशीम हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. लगतच्या मराठवाड्यातील काही जिल्ह्याशीही त्यांची नाळ जुळलेली आहे. बुलडाणा ही जन्मभूमी तर कर्मभूमी वाशीम आणि अकोला राहिले आहे. तत्कालीन राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले. नंतर याच गावंडे पिता-पुत्रांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन येण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. अन शरद पवार यांचा विश्वास प्राप्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे अकोला जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे विभागीय समन्वयक (अमरावती),, प्रदेश चिटणीस, प्रदेश संघटक अशी अनेकानेक पदे भूषविली. या पदांवर काम करताना पक्षश्रेष्ठींना अपेक्षित सारेकाही दिले. आता त्यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश घेतला आहे.
मुख्यमंत्री यांनी माझ्यावर विश्वास दाखवून पक्षाच्या समन्वयकाची जबाबदारी दिली. त्यांनी दाखविलेला विश्वास कुठेही कमी होऊ देणार नाही. विदर्भासोबतच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शिवसेना वाढविणार आहे. - रामेश्वर पवळ, समन्वयक, (शिंदे गट).
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"