रामनवमी शोभायात्रा समितीने दिला तेजसला मदतीचा हात
By admin | Published: January 8, 2017 02:46 AM2017-01-08T02:46:20+5:302017-01-08T02:46:20+5:30
‘लोकमत’ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद.
अकोला, दि. ७- एक किडनी निकामी झाल्यानंतर दुसरी किडनी निकामी होण्यापासून वाचविण्यासाठी येथील एका खासगी इस्पितळात दाखल असलेल्या तेजस डांगे या चिमुकल्याच्या मदतीसाठी सहृदयी समाजाने पुढे यावे, यासाठी ह्यलोकमतह्णने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देताना रामनवमी शोभायात्रा समितीने शनीवारी या बालकाच्या उपचारासाठी मदतीचा हात दिला. आमदार गोवर्धन शर्मा यांनी शनीवारी इस्पितळात जाऊन तेजसच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना १५ हजार रुपये रोख स्वरूपात मदत दिली.
अकोट तालुक्यातील किनखेड पूर्णा येथील तेजस शहादेव डांगे (९) या चिमुकल्याची एक किडनी निकामी झाली असून, दुसरी निकामी होण्याच्या मार्गावर आहे. दुसरी किडनी वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे; परंतु शस्त्रक्रियेसाठी ७0 हजार रुपयेसुद्धा डांगे कुटुंबीयांकडे नाहीत. तेजसचे प्राण वाचविण्यासाठी सहृदयी, दानशूर समाजाने पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन ह्यलोकमतह्णने ह्यमदतीचा हातह्ण या सदराखाली शनीवारी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकजण पुढे येत असून, शुक्रवारी रामनवमी समितीच्यावतीने आमदार गोवर्धन शर्मा यांनी डांगे कुटुंबीयांना १५ हजार रुपयांची मदत सुपूर्द केली. यावेळी अशोक गुप्ता, गिरीराज तिवारी, मोहन गुप्ता, नवीन गुप्ता, संदीप वाणी व वसंत बाछुका आदी उपस्थित होते.
विश्व चॅरिटेबल ट्रस्टची पाच हजारांची मदत
तेजसच्या उपचारासाठी अनेकजण पुढे येत असून, शुक्रवारी सकाळपासून मदतीसाठी अनेकांचे फोन येत आहेत. विश्व चॅरिटेबल ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने तेजसच्या उपचारासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश दिल्याचे तेजसचे आजोबा रामचंद्र डांगे यांनी सांगितले.