‘त्या’ चिमुकलीच्या मदतीसाठी रामनवमी शोभायात्रा समिती सरसावली
By admin | Published: April 18, 2017 01:47 AM2017-04-18T01:47:11+5:302017-04-18T01:47:11+5:30
आ. शर्मा यांनी घेतली भेट; जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रयत्न
अकोला : अत्याचारामुळे गंभीर जखमी झालेल्या दहा वर्षीय बालिकेच्या मदतीसाठी श्रीरामनवमी शोभायात्रा समिती सरसावली. आमदार गोवर्धन शर्मा यांनी सोमवारी पीडित बालिकेची सर्वोपचार रुग्णालयात जाऊन भेट घेतली. ‘त्या’ निरागस बालिकेच्या नावाने आर्थिक रक्कम जमा करण्यात आली असून, अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.
शहरातील दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याची घटना १५ एप्रिल रोजी त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ बालिकेवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आ. गोवर्धन शर्मा यांनी पीडित बालिकेची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच कुटुंबातील व्यक्तींना घरी भेट दिली.
बालिकेच्या प्रकृतीबद्दल उपचार करणाऱ्या डॉ. माधुरी येवले यांच्यासोबत चर्चा केली. याप्रसंगी वसंत बाछुका, अशोक गुप्ता, कैलाश मामा अग्रवाल, वसंत खंडेलवाल, किशोर मांगटे पाटील, डॉ. अभय जैन, गिरीश जोशी, नवीन गुप्ता, मोहन गुप्ता, प्रा. अनुप शर्मा आदी उपस्थित होते.
निर्भया फंडासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
अत्याचारग्रस्त पीडित बालिकेला निर्भया फंडातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आ. गोवर्धन शर्मा मुख्यमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती आहे. तसेच नराधमांना कठोर व तातडीने शिक्षा व्हावी यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.