पाण्यासाठी जनावरांची धावाधाव!
By admin | Published: December 1, 2014 12:31 AM2014-12-01T00:31:08+5:302014-12-01T00:31:08+5:30
पाणीटंचाईचा फटका : समस्या तीव्र होणार.
अकोला: अल्प पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत असतानाच, पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांचीही धावाधाव सुरू झाली आहे. ही समस्या येणार्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप पिके शेतकर्यांच्या हातून गेली. तसेच धरणांमध्ये पुरेसा जलसाठाही उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, धरणांमध्ये अल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. खारपाणपट्टय़ातील जिल्ह्यातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना सध्या पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गोड पाण्याचे स्रोत उपलब्ध नसलेल्या इतर गावातही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत जनावरांना पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उपस्थित झाला आहे. काही गावांमध्ये तलावात सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यावर जनावरांना तहान भागवावी लागत आहे. गाळ साचलेल्या तलावांमधील शेवाळलेल्या पाण्यावर तसेच गावातील नाल्याच्या ठिकाणी तहान भागविण्यासाठी गुरा-ढोरांना धावाधाव करावी लागत आहे. मात्र गावतलावांमधील पाणी आणखी महिना-दीड महिना पुरणार आहे. तलावातील पाणी आटल्यानंतर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसातच आणखी गंभीर होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. या पृष्ठभूमीवर दुष्काळी परिस्थितीत नापिकी आणि पाणीटंचाईच्या झळा सोसणार्या ग्रामस्थांना जनावरांच्या पाण्याची चिंताही सतावत आहे.