रानडुकराच्या हल्ल्यात युवक जागीच ठार
By admin | Published: April 6, 2016 01:54 AM2016-04-06T01:54:02+5:302016-04-06T01:54:02+5:30
रिसोड तालुक्यातील घटना ; मृत बुलडाणा जिल्ह्यातील
रिसोड: शेतशिवारात असलेल्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका २८ वर्षीय युवकावर रानडुकराने हल्ला चढविला. पोट, मांडी व शरिराच्या अन्य भागावर हल्ला केल्याने सदर युवकाने जाग्यावरच प्राण सोडले. ही धक्कादायक घटना तालुक्यातील तालुक्यातील करडा येथे ५ एप्रिल रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. सुनील पन्नासे भोसले असे मृतक युवकाचे नाव असून, तो बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्हय़ातील अरवड येथील सुनील भोसले यांची सासरवाडी रिसोड तालुक्यातील बिबखेडा आहे. तीन दिवसांपासून सुनील हा बिबखेडा येथे आलेला होता. मंगळवारी तो तालुक्यातील करडा येथील महादेवबाबा मंदिरात दर्शनासाठी जात असताना, रानडुकराने त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. पोट, मांडी व शरिराच्या अन्य भागावर चावे घेतल्याने तसेच हल्ला चढविल्याने सुनील हा जागेवरच बेशुद्ध पडला. शेतशिवारातून जाणार्या काही नागरिकांना हा प्रकार निदर्शनात येताच, सुनीलला ग्रामीण रुग्णालय रिसोड येथे तातडीने आणण्यात आले; मात्र तोपर्यंत बराच वेळ झाला होता. डॉक्टरांनी सुनील भोसले यास मृत घोषित केले. सुनीलच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून, पत्नी, दोन मुली व मुलगा पोरका झाला आहे. अलिकडच्या काळात रानडुकराच्या हल्ल्यात युवक ठार होण्याची ही पहिली घटना घडल्याने करडा शेतशिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुनीलच्या अपघाती मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. या भागात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून, पिकांचे नुकसान मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.