रखडलेल्या रस्त्यांच्या कामांवरून राजकारण्यांत रंगला राडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:23 AM2021-08-13T04:23:22+5:302021-08-13T04:23:22+5:30
अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रखडलेल्या रस्ते कामांच्या मुद्द्यावर आमदार प्रकाश भारसाकळे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ...
अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील रखडलेल्या रस्ते कामांच्या मुद्द्यावर आमदार प्रकाश भारसाकळे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बोलविलेल्या बैठकीत अकोट व तेल्हारा या दोन्ही तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आपसांत चांगलीच जुंपली. त्यामध्ये झालेल्या ‘हमरीतुमरी’च्या प्रकाराने रस्ते कामांच्या मुद्द्यावरून राजकारण्यांमध्ये राडा रंगल्याचा प्रत्यय आला.
तेल्हारा तालुक्यातील वणी वारुळा ते वरवट बकाल आणि आडसूल ते हिवरखेड या रस्त्यांची कामे रखडल्याच्या मुद्द्यावर आमदार प्रकाश भारसाकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात अकोट व तेल्हारा तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, अकोल्याचे माजी महापौर विजय अग्रवाल, तेल्हारा नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.
शिवसेना सदस्य आक्रमक
तेल्हारा तालुक्यातील रखडलेल्या संबंधित रस्ते कामांच्या मुद्द्यावरील चर्चेत बाळापूर तालुक्यातील दिंडी मार्गासह काही रस्त्यांची अशीच अवस्था असल्याचा उल्लेख आमदार भारसाकळे यांनी उल्लेख केल्याने या मुद्द्यावरून शिवसेना जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ व आ. भारसाकळे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. तसेच तेल्हारा तालुक्यातील रखडलेल्या रस्ते कामांच्या विषयावरून अकोट येथील भाजपचे राजू रावणकर व जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी पुंडलिकराव अरबट यांच्यात एकमेकांवर धावून जात हमरीतुमरी झाली. रखडलेल्या रस्ते कामांवरून अकोट व तेल्हारा तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये आपसात झालेला वाद आणि खडाजंगीने राजकारण्यांमध्ये राडा रंगल्याचा प्रत्यय आला.