रणजित पाटील यांना शिक्षक आघाडीचा पाठिंबा !
By Admin | Published: January 30, 2017 03:31 AM2017-01-30T03:31:34+5:302017-01-30T03:31:34+5:30
पत्रकार परिषदेत आमदार श्रीकांत देशपांडे यांची घोषणा
अकोला, दि. २९- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांना शिक्षक आघाडी पाठिंबा देत असल्याची घोषणा आमदार श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत केली.
आ. श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मी शिवसैनिक आणि शिवसेनेचा पदाधिकारी असलो, तरी मला कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नव्हता. शिक्षक आघाडीनेच मला निवडून आणले. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यात डॉ. रणजित पाटील यांनी नेहमीच सहकार्य केले. विनाअनुदानित शाळांचे प्रश्न आणि औरंगाबाद येथील शिक्षकावरील गुन्हे दाखलप्रकरणी न्याय देण्याचे कार्य डॉ. पाटील सातत्याने करीत आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून हा पाठिंबा दिलेला नाही. व्यक्तिगत डॉ. पाटील यांना हा पाठिंबा आहे. यासाठी शिक्षक आघाडीच्या केंद्रीय पदाधिकार्यांच्या बैठकीत मतदान झाले. त्यानंतर मताधिक्याने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ३ फेब्रुवारी रोजी होणार्या निवडणुकीत विभागातील पाचही जिल्हय़ांतील ५६ तालुक्यांतील कार्यकर्ते व पदाधिकारी डॉ. पाटील यांच्या पाठीशी आहेत, असेही आमदार देशपांडे यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षक आघाडीचे पदाधिकारी सुभाष धार्मिक, विलास राऊत, सैयद राजीक, नरेंद्र गुल्हाने, फैयाज अहेमद, डी.एन. कडू व विलास बोरघाटे प्रामुख्याने उपस्थित होते.