वस्तापूर मानकरी येथील युवतीवर मेळघाटात बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:48 AM2017-07-31T02:48:05+5:302017-07-31T02:48:08+5:30
अकोला : बाराव्या वर्गाची टीसी काढण्यासाठी टेंभ्रूसोंडा येथील आश्रमशाळेत गेलेल्या वस्तापूर मानकरी येथील १८ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना २८ जुलै रोजी उघडकीस आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाराव्या वर्गाची टीसी काढण्यासाठी टेंभ्रूसोंडा येथील आश्रमशाळेत गेलेल्या वस्तापूर मानकरी येथील १८ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना २८ जुलै रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पीडित युवती व तिचे वडील अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार देण्यासाठी आले असता, घटनास्थळ चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीत असल्याने तिथे पाठवण्यात आले. चिखलदरा पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली.
अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या वस्तापूर मानकरी येथील १८ वर्षीय युवती टेंभ्रूसोंडा येथील आश्रमशाळेत टीसी काढण्यासाठी गेली होती. तेथून परत येत असताना पंकज ईश्वर गौतम, सोनू बलराम सालवे व दादू सुखा यांनी तिला गावाला सोडून देतो असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून ती त्यांच्यासोबत गेली. तिला घरी सोडून न देता आरोपींनी धारणीच्या जंगलात नेले. तेथे जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यानंतर त्यांनी तिला रानपिसा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे नेले. तेथेही तिच्यावर १८ ते २३ तारखेपर्यंत अत्याचार केले. इतकेच नव्हे, तर आरोपींच्या गावी माजरोड येथेही २६ जुलैपर्यंत अत्याचार केले. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीला सोडून दिले. घरी पोहोचताच पीडितेने पालकांना आपबिती सांगितली. तिच्या पालकांनी २८ जुलै रोजी पीडितेबरोबर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. मात्र, अकोट पोलिसांनी घटनास्थळ चिखलदरा पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्यांना तेथेच फिर्याद देण्याचा सल्ला दिला. शेवटी पीडितेच्या पालकांनी चिखलदरा ठाणे गाठून याबाबत तक्रार केली. या फिर्यादीवरून चिखलदरा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६३, ३७६, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
२८ जुलै रोजी पीडित युवती तिच्या वडिलांबरोबर ग्रामीण पोलिस स्टेशनला आली होती. घटनास्थळ चिखलदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांनी आम्हाला तेथेच तक्रार दाखल करायची असल्याचे सांगितले.
- पी.जे. अब्दागिरे, ठाणेदार, अकोट ग्रामीण पोलीस ठाणे