CoronaVirus : आता गंभीर रुग्णांची रॅपिड टेस्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 10:25 AM2020-07-26T10:25:48+5:302020-07-26T10:26:00+5:30
तासाभरातच कोरोनाचे निदान करणे शक्य होत असून, रुग्णाला योग्य उपचार मिळण्यास मदत होत आहे.
अकोला : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना वेळेत उपचार मिळावा तसेच जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट करण्यात येत आहे. त्यामुळे तासाभरातच कोरोनाचे निदान करणे शक्य होत असून, रुग्णाला योग्य उपचार मिळण्यास मदत होत आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्युदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. हा प्रकार थांबविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने प्रभावी तोडगा म्हणून गंभीर रुग्णांची २१ जुलैपासून रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. गंभीर रुग्णाची रॅपीड अॅन्टिजन टेस्ट केल्यामुळे ३० मिनिटात संबंधित रुग्णाला कोरोना आहे किंवा नाही, याचे निदान होत आहे. त्यामुळे तासाभरात रुग्णावर योग्य उपचार करणे डॉक्टरांना शक्य होत आहे. वेळेवर उपचार मिळू लागल्याने मृत्युदर रोखण्यासही मदत होत आहे. यासाठी डॉ. अपर्णा वाहने आणि डॉ. कृष्णमुरारी शर्मा यांनी पुढाकार घेतला आहे.
पाच दिवसांत ४१ चाचण्या; ९ पॉझिटिव्ह!
गत पाच दिवसांपासून सर्वोपचार रुग्णालयात ४१ गंभीर रुग्णांच्या रॅपिड अॅन्टिजन चाचण्या करण्यात आल्या. यातील ९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे या रुग्णांना भरती केल्यानंतर तासाभरातच उपचार मिळणे शक्य झाले आहे.
गंभीर रुग्णांना कोरोना आहे किंवा नाही, याचे वेळेवर निदान झाल्यास त्यांना योग्य उपचार देणे शक्य होईल. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयात गत पाच दिवसांपासून गंभीर रुग्णांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट करण्यात येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रुग्णांना तासाभरात उपचार मिळायला सुरुवात झाली आहे.
-डॉ. मीनाक्षी गजभिये,
अधिष्ठाता, जीएमसी, अकोला