पातूर येथील बँकेत कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:18 AM2021-04-04T04:18:47+5:302021-04-04T04:18:47+5:30
------------------------------------------------------ रुपनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी मोंढे दहिहांडा : विदर्भ शेतकरी शिक्षण संस्थाद्वारा संचालित रुपनाथ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य ...
------------------------------------------------------
रुपनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी मोंढे
दहिहांडा : विदर्भ शेतकरी शिक्षण संस्थाद्वारा संचालित रुपनाथ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी विजय बळीराम मोंढे यांची नियुक्ती झाली आहे. प्राचार्य गजानन कुलकर्णी यांनी मोंढे यांच्याकडे पदभार सोपविला. संस्थेतर्फे पदाधिकारी अविनाश नानोटी यांनी पुष्पगुच्छ देऊन मोंढे यांना शुभेच्छा दिल्या. (पासपोर्ट)
---------------------------------------------------------------
कोविड लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद
अकोट : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा आकडा दररोज वाढतच चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. तालुक्यात कोविड लसीकरण सुरू करण्यात आले असून, या लसीकरणला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
----------------------------------------------------
बोरगावात मास्कची मागणी वाढली !
बोरगाव मंजू : कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. गावामध्ये मास्कची मागणी वाढली असून, विक्रेत्यांनीसुद्धा विविध प्रकारचे मास्क उपलब्ध केले आहेत. गत काही दिवसांपासून मास्कची मागणी वाढली असून, परिसरात बहुतांश नागरिक मास्क लावलेले दिसून येत आहेत.
-------------------------------------------------------------
ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती
बार्शीटाकळी : तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांवरही या आजाराचे सावट पसरले आहे. आरोग्य प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. ग्रामीण भागात कोरोना लसीकरण केले जात असले तरी, कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
-----------------------------------------------
बाजारात नागरिकांची गर्दी; धोका वाढला!
वाडेगाव : येथून जवळच असलेल्या देगाव येथील बाजारात नागरिकांनी गर्दी केली होती. परिसरातील नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी विक्रेत्यांसह नागरिक विनामास्क दिसून आले. नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे.
--------------------------------------------------
पक्ष्यांसाठी जलपात्र लावण्याचे आवाहन
तेल्हारा : तालुक्यातील नागरिकांनी उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांसाठी घरावर जलपात्र लावावे, असे आवाहन पक्षिमित्र संघटनेने केले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे वन्यजीव तसेच पक्षांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी पक्ष्यांची भटकंती होत असल्याने घराच्या छतावर जलपात्र ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-----------------------------------------------------------------
प्रवासी निवाऱ्यांना दुरुस्तीची प्रतीक्षा
आगर : आगर परिसरातील उगवा, खेकडी, नवथळ आदी गावांतील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे, तर काही गावांच्या प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच प्रवासी निवाऱ्यांमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने प्रवासी वैतागले आहेत.
---------------------------------------------
रस्त्यावरील सांडपाण्यामुळे समस्या वाढीस
मूर्तिजापूर : नालीतील सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सांडपाण्याची दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना श्वास घेणे नकोसे झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
-----------------------------------------------------------------
पांढुर्णा परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा शेत शिवारात गत आठवड्यापासून वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी पिकांमध्ये शिरुन पिकांची नासाडी करीत असल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देऊन वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------------------------------
वीजबिले कमी करण्याची मागणी
चिखलगाव : कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत आलेले वीजबिल व त्यावर लावलेला अधिभार निम्मे करून देण्याची मागणी शेतकरी आणि सर्वसामान्यांकडून होत आहे. लॉकडाऊन काळात संकटात सापडलेल्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वीज बिले कमी करण्याची मागणी होत आहे.
------------------------------------------------------
उन्हाळी सोयाबीनची लागवड!
वाडेगाव : मागील खरीप पिकामध्ये अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली होती; परंतु अवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. तामशी येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड करून आगळा प्रयोग केला आहे.
-------------------------------------------------------------
दहिहांडा परिसरात नागरिक बेफिकीर
दहिहांडा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही परिसरात नागरिक बेफिकीर होत वावरताना दिसत आहेत. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर कोणीच करताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------------------------------------------------------------
इंधन दरवाढ; यांत्रिक मशागत महागली !
कुरुम : पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवत असतानाच ट्रॅक्टरची मशागतही महागली आहे.
-----------------------------------------------------------------