राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन रविवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:36 PM2018-12-05T12:36:52+5:302018-12-05T12:37:02+5:30
अकोला: भारतीय विचार मंच विदर्भ, अ.भा. गुरुदेव सेवा मंडळ, कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी व कर्मयोगी शिक्षण प्रसारक संस्थेच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन ९ डिसेंबर रोजी शासकीय अध्यापक महाविद्यालय, रामदासपेठ येथे होणार आहे.
अकोला: भारतीय विचार मंच विदर्भ, अ.भा. गुरुदेव सेवा मंडळ, कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी व कर्मयोगी शिक्षण प्रसारक संस्थेच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सहावे विदर्भस्तरीय साहित्य संमेलन ९ डिसेंबर रोजी शासकीय अध्यापक महाविद्यालय, रामदासपेठ येथे होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर करतील. प्रमुख अतिथी म्हणून गुरुकुंज आश्रम मोझरीचे अ.भा. सरचिटणीस जनार्दनपंत बोथे राहतील. स्वागताध्यक्षपदी प्राचार्य डॉ. शांताराम बुटे राहतील, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कविश्वर यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली.
संमेलनाचा प्रारंभ सकाळी ग्रंथदिंडीने होईल. संमेलनातील पहिल्या परिसंवाद प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘गाव व गावातील माणूस राष्ट्रसंतांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू’ विषयावर होईल. यात प्रशांत महाराज ताकोते ‘हे ग्राम हे मंदिर, त्यातील जुने सर्वेश्वर’, विहिंपचे प्रांत संघटनमंत्री अरुण नेटके हे ‘हो राममय अरू कृष्णमय’ तर शेगावचे सुशील महाराज वणवे हे ‘चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन’ विषयावर चिंतन सादर करतील. दुसरा परिसंवाद डॉ. वसुधा देव यांच्या अध्यक्षतेखाली ‘पावो सदा यशाला हा राष्ट्रधर्म माझा’ विषयावर होईल. यात वाशिमचे डॉ. राजेश लव्हाळे हे ‘कोवळ्या कळ्यांमाजी लपले ज्ञानेश्वर, रवींद्र, शिवाजी’ हा विषय, प्रा. डॉ. ममता इंगोले या ‘ग्रामगीतेतील मातृशक्ती’, तर नागपूरचे प्रा. डॉ. राजेंद्र नाईकवाडे हे ‘राष्ट्रसंतांच्या साहित्य राष्ट्रदर्शन’ विषयावर चिंतन मांडतील. रविवारी सायंकाळी संमेलनाचा समारोप होईल. यावेळी प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. राम देशमुख, माजी आमदार वसंतराव खोटरे, माजी आयुक्त नीळकंठ देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहतील. संमेलनात राष्ट्रसंताच्या जीवनकार्यावरील चित्रप्रदर्शन राहील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वारकरी संप्रदायातील सोनोपंत दांडेकर यांच्या पुण्यस्मरणाचे ५0 वे वर्ष आहे, असेही कविश्वर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला संयोजक प्रा. किशोर बुटोले, सहसंयोजक समीर थोडगे, गुरुदेव सेवा मंडळाचे भानुदास कराळे, विचार मंचाचे प्रांत संयोजक डॉ. सुभाष लोहे, महानगर संयोजक महेश मोडक उपस्थित होते. (प्रतिनिधी)