हरभरा, तूरपाठोपाठ मठाचे भाव कोसळण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:55 PM2020-02-08T12:55:41+5:302020-02-08T12:56:17+5:30
फेब्रुवारी महिन्यात होलसेल बाजारातील मठाचे भाव ६८ रुपये किलोचे नोंदविले गेले आहे.
अकोला : गत तीन दिवसांत हरभरा, तूरपाठोपाठ मठाचे भाव कोसळण्याचे संकेत मिळत असल्याने अकोल्यातील बाजारपेठेत मठाची उचल थांबली आहे. राजस्थानातून येणारे मठ मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल होत असल्याने हा परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. फेब्रुवारी महिन्यात होलसेल बाजारातील मठाचे भाव ६८ रुपये किलोचे नोंदविले गेले आहे. यात आठ ते दहा रुपयांची घसरण येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
बाजारपेठेतील धान्याचे भाव एकापाठोपाठ एक सातत्याने घसरत असल्याने अडते आणि धान्य व्यापारी हादरले आहेत; मात्र सर्वसामान्य जनतेला या उतरंडीचा चांगलाच दिलासा मिळत आहे. हरभरा आणि तुरीचे नवीन उत्पादन येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशातील हरभरा-तूर येत असल्याने मोठ्या प्रमाणात भाव पडले आहेत. यातून शेतकरी सावरत नाही तोच, मठाचे भावदेखील कोसळण्याचे संकेत मिळत आहे. राजस्थानात परिसरात यंदा मठाचे पीक चांगले असून, ते बाजारपेठेत दाखल होत आहे. त्यामुळे मठाचे भाव पडण्याची शक्यता आहे. मठाचे भाव कोसळ्याचे संकेत मिळाले असल्याने अकोला धान्य बाजारातील ठोक व्यापाऱ्यांनी मठाची नवीन खरेदी थांबविली आहे. मठाची उचल होत नसल्याने हा प्रकार समोर आला आहे. बाजारपेठेतील तज्ज्ञांनी व्यक्त केलेली शंका कितपत खरी ठरते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.