अकोल्यात भर पावसात निघाली भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा : शेकडो भाविक झाले सहभागी
By Atul.jaiswal | Updated: July 7, 2024 19:23 IST2024-07-07T19:23:34+5:302024-07-07T19:23:43+5:30
भर पावसात निघालेल्या रथयात्रेत सहभागी शेकडो भाविकांनी केलेल्या जय जगन्नाथच्या गजराने आसमंत निनादून गेला होता.

अकोल्यात भर पावसात निघाली भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा : शेकडो भाविक झाले सहभागी
अकोला: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरी धाम येथील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेचे औचित्य साधून आंतराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) अकोला यांच्या वतीने रविवारी (७ जुलै) सायंकाळी शहरातून रथयात्रा काढण्यात आली. भर पावसात निघालेल्या रथयात्रेत सहभागी शेकडो भाविकांनी केलेल्या जय जगन्नाथच्या गजराने आसमंत निनादून गेला होता.
इस्कॉनचे विदर्भ झोनल पर्यवेक्षक पूज्य अनंतशेषप्रभूजी यांच्या मार्गदर्शनात व अकोला इस्कॉनचे अध्यक्ष पूज्य वैदर्भीचरण प्रभूजी यांच्या पुढाकारातइ सरकारी बगीचा परिसरातील इस्कॉन सेंटर येथून सायंकाळी भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या रथात भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणी माता सुभद्रा यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.
इस्कॉन सेंटर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत रथाची पूजा करण्यात आली. त्यानंतर, भगवान जगन्नाथांचा जयघोष करत भाविकांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला. पारंपरिक वाद्याच्या गजरात ही रथयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, राणीसती धाम, गांधी रोड, सीटी कोतवाली चौक, खोलेश्वर, सरकारी बगिचा अशी मार्गक्रमण करत मित्र समाज क्लब येथे आली. त्या ठिकाणी रथ यात्रेचा समारोप करण्यात आला. शहरातील अनेक भाविक या रथयात्रेत सहभागी झाले होते. रथयात्रेत सहभागी इस्कॉनच्या सदस्यांनी रथयात्रेचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वितरण केले.
भाविकांनी पावसात धरला फेर
रथयात्रा सुरु होण्यापूर्वीच शहरात पावसाने जाेरदार हजेरी लावली. पाऊस सुरु असतानाच रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. रथयात्रेत सहभागी झालेल्या महिला व पुरुष भाविकांनी हरे रामा-हरे कृष्णाच्या धूनवर भर पावसात फेर धरला. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
इस्कॉन धाममध्ये जगन्नाथ उत्सव
रथयात्रेचा समारोप झाल्यानंतर इस्कॉन धाममध्ये भगवान जगन्नाथाचा भव्य उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाविकांना महाप्रसादाचे वितरण केल्यानंतर जगन्नाथ उत्सवाची सांगता करण्यात आली.